मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रातील वैज्ञानिकांनी रामपत्री वनस्पतीच्या फळाच्या अर्कापासून दोन कर्करोगविरोधी औषधे तयार केली आहेत. ही औषधे सीबीएमजी केंद्रात बनवण्यात आली असून भाभा अणुसंशोधन केंद्राच्या मुंबई येथील प्रयोगशाळेत रामपत्रीच्या फळाचा अर्क काढून तयार केलेली औषधे केमोथेरपीत हानी पोहोचलेल्या पेशींना वाचवतात व कर्करोग पेशींची वाढ होऊ देत नाहीत. रामपत्री ही वनस्पती मायरिस्टिका समूहातील असून ती आयुर्वेदिक औषधात कर्करोग प्रतिबंधक म्हणून वापरतात. या वनस्पतीपासून तयार केलेल्या औषधांचे प्रयोग उंदरांवर केले असता त्यात फुप्फुसाचा कर्करोग व न्यूरोब्लास्टोमा या कर्करोगात त्यांचा चांगला परिणाम दिसून आला. अ‍ॅड्रेनल ग्रंथी, मान, छाती व मेरुरज्जूतील कर्करोग पेशी मेंदूतील चेतापेशींना ग्रस्त करीत असतात. त्याला न्यूरोब्लास्टोमा म्हणतात. भाभा अणुसंशोधन केंद्राच्या जैव विज्ञान विभागाने वनौषधींपासून कर्करोगावर औषधे तयार करण्याचे काम सुरू केले आहे. रामपत्री फळाच्या अर्कात असलेले रेणू कर्करोगास मारक असतात असे दिसून आले आहे. संशोधकांनी रेडिओ मॉडिफायर व रेडिओ प्रोटेक्टर या स्वरूपात काही औषधे तयार केली आहेत. रेडिओ मॉडिफायरमुळे केमोथेरपीत निरोगी पेशींचे रक्षण होते. वैद्यकपूर्व चाचण्यात ही औषधे प्रभावी ठरली असून माणसांवर चाचण्यांसाठी औषध महानियंत्रकांकडे परवानगी मागितली आहे.