रिलायन्स जिओने काही दिवसांपूर्वी बाजारात येत सर्वांनाच धक्का दिला होता. जिओच्या धमाकेदार ऑफर्समुळे बाजारातील इतर कंपन्यांचे धाबे दणाणले होते. काही दिवसांपूर्वी जिओने आपला फोन बाजारात दाखल करत टेलिकॉम क्षेत्रात आणखी एक धक्का दिला होता. टेलिकॉम क्षेत्रात सुरु असणारी चुरस लक्षात घेऊन कंपन्या आपल्या प्लॅन्सची किंमत शक्य तितकी कमी ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकतेच जिओने आपले काही प्लॅन स्वस्त करत या स्पर्धेत आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहक जिओकडे आकर्षित होतील अशी कंपनीला आशा आहे.
सुरूवातीला जिओने ‘हॅपी न्यू इयर’ प्लॅन अंतर्गत ग्राहकांना प्रतिदिन १ जीबी डेटाचा प्लॅन आणला होता. आता ग्राहकांना आणखी दोन ऑफरचा लाभ घेता येणार आहे. १ जीबी डेटाच्या प्लॅनची किंमत कंपनीने ६० रूपयांवरून ५० रूपयांवर आणली आहे. तर २८ जीबी डेटाचा प्लॅन १९९ ऐवजी आता १४९ रूपयात मिळणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी २८ दिवस असेल. ७०जीबी डेटा प्लॅनदेखील आता ३९९ ऐवजी ३४९ रूपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी ७० दिवसांची आहे. या नवीन प्लॅनमुळे ग्राहकांना कमी किंमतीत ५० टक्के अधिक डेटा मिळणार असून ग्राहकांना ९ जानेवारीपासून या नवीन प्लॅनचा लाभ घेता येईल असे कंपनीने सांगितले आहे.
नुकत्याच जिओने आपल्या काही खास कॅशबॅक ऑफरही जाहीर केल्या होत्या. यामध्ये ३९९ रुपयाचे रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना तब्बल ३३०० रुपयांची कॅशबॅक मिळणार असल्याचे जाहीर केले होते. त्याआधीही कंपनीने ३९९ आणि त्याहून अधिक रुपयांच्या रिचार्जवर जवळपास २५९९ रुपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफर जाहीर केली होती.