रिलायंस इंडस्ट्रीजचे (RIL) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी नवीन ऑनलाइन-टू-ऑफलाइन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म लाँच करण्याच्या तयारीत आहे. वॉलमार्ट आणि फ्लिपकार्टसारख्या कंपन्यांना तगडं आव्हान निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून रिलायंस जिओ एका सुपर अॅपवर काम करत आहे. रिलायंस जिओच्या या सुपर अॅपद्वारे ग्राहकांना एकाचवेळी एकाच ठिकाणी 100 हून अधिक सेवांचा लाभ घेता येणार आहे.

रिलायंस जिओ सद्यस्थितीला भारतात 30 कोटींहून अधिक सबस्क्राइबर्सना सेवा पुरवत आहे, त्यामुळे हे अॅप ललाँच केल्यानंतर जिओ कंपनीचा भारतीय बाजारातील दबदबा मोठ्या प्रमाणात वाढेल, असं तद्ज्ञांचं म्हणणं आहे. मात्र, हे अॅप नेमकं कधीपर्यंत लाँच केलं जाणार आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

जिओचा दबदबा वाढणार – इंडस्ट्री इंटेलीजेंस ग्रुपचे (IIG) प्रमुख प्रभु राम यांनी सांगितलं की, जिओची उपकरणं सर्व ठिकाणी पोहोचली आहेत, त्यामुळे रिलायंसची ताकद आधीच वाढली आहे आणि ते उत्तम स्थितीत आहेत. जिओचं हे सुपर अॅप एकाच ठिकाणी ई-कॉमर्स, ऑनलाइन बुकिंग आणि पेमेंट्स यांसारख्या सेवा पुरवेल. सर्व सेवा एकाच ठिकाणी असलेलं हे अॅप भारतीय ग्राहकांच्या पसंतीस पडेल आणि त्यांचा याला उत्तम प्रतिसाद मिळेल असंही राम म्हणाले. रिलायंस जिओकडे सध्या कन्व्हर्सेशनल आर्टिफिशिअल इंटेलीजंस (AI) लेयर, एक व्हर्नाकुलर व्हॉइस टेक लेयर, एक लॉजिस्टिक्स लेयरसह AI आधारित एजुकेशन लेयर आहे. जिओ उपकरणांसह या सर्व गोष्टी मिळत असल्यामुळे स्नॅपडील, पेटीएम, फ्रीचार्ज, फ्लिपकार्ट आणि हाइक यांसारख्या कंपन्यांच्या तुलनेत रिलायंस भारतातील WeChat बनवण्याच्या भक्कम स्थितीत आहे, असंही राम यांनी सांगितलं.