अवघ्या काही वर्षांमध्ये मोबाइल क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केलेल्या रिलायन्स जिओने पुन्हा एकदा डाऊनलोड स्पीडमध्ये बाजी मारली आहे. ऑगस्ट महिन्यात रिलायन्स जिओचा सरासरी डाऊनलोड स्पीड 21.3 एमबीपीएस इतका नोंदवण्यात आला. दूरसंचार नियामक प्राधिकरण ट्रायने जाहीर केलेल्या अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, 5.5 एमबीपीएस अपलोड स्पीडसह व्होडाफोन या कंपनीने अपलोडींग स्पीडमध्ये बाजी मारली आहे.

जिओनंतर सरासरी सर्वाधिक डाऊनलोड स्पीडमध्ये एअरटेलने दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे ट्रायच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. एअरटेलच्या ग्राहकांना 8.2 एमबीपीएसचा डाऊनलोड स्पीड मिळत असल्याचं ट्रायनं म्हटलं आहे. तर त्या खालोखाल व्होडाफोन (7.7 एमबीपीएस) आणि आयडीया सेल्युलर (6.1 एमबीपीएस) या कंपन्यांचा क्रमांक येतो. व्होडाफोन आणि आयडिया सेल्युलर या कंपन्यांचं मर्जर झालं असलं तरी ट्रायकडून दोन्ही कंपन्यांबाबत वेगवेगळा अहवाल सादर करण्यात येतो. सध्या दोन्ही कंपन्यांचे नेटवर्क एकत्रिकरणाची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. अपलोड श्रेणीमध्ये जिओ (4.4 एमबीपीएस) आणि एअरटेल (3.1 एमबीपीएस) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

आणखी वाचा : मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीची सुविधा स्वस्त, Trai ने घटवले दर

दरम्यान, सरकारी कंपनी बीएसएनएल अद्यापही 4 जी स्पेक्ट्रमच्या प्रतिक्षेत आहे. बीएसएनएल 3 जी डाऊनलोडींग स्पीडमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. ट्रायच्या अहवालानुसार बीएसएनएलचा सरासरी डाऊनलोड स्पीड 2.6 एमबीपीएस तर अपलोड स्पीड 1.2 एमबीपीएस आहे. तर यानंतर डाऊनलोड स्पीडमध्ये आयडिया सेल्युलर (2 एमबीपीएस), व्होडाफोन (1.8 एमबीपीएस) आणि एअरटेल (1.5 एमबीपीएस) यांचा अनुक्रमे दुसरा, तिसरा आणि चौथा क्रमांक येतो. तर थ्रीजी सेवांमध्ये अपलोड स्पीडमध्येही बीएसएनएलनेच बाजी मारल्याचे दिसत आहे.