How To Wash Fruits Perfectly: असं म्हणतात की एखाद्या गोष्टीचा अतिरेक केला किंवा अगदीच दुर्लक्ष केलं तर दोन्ही पद्धतीने आपलं नुकसानच होऊ शकतं. ही बाब आपल्या आहाराला सर्वात मोठ्या प्रमाणात लागू होते. हेल्दी पर्याय म्हणून अनेकजण फलाहार करतात. त्यात चूक काहीच नाही. पण पावसाळ्याच्या दिवसात जर तुम्ही फळं नीट स्वच्छ केली नाहीत तर मात्र विनाकारण रोगांना आमंत्रण मिळू शकते. काहीजण फळं धुण्याच्या नावाखाली फक्त काही सेकंद पाण्याखाली धरतात आणि खायला घेतात तर काहीजण मात्र अगदी फळांचे काप करून मग बेकिंग सोडा अगदी डिटर्जंटने सुद्धा फळे धुतात. खरं सांगायचं तर या दोन्हीमध्ये तुमचेच नुकसान आहे. आज आपण तज्ज्ञांकडून फळं धुण्याची अचूक पद्धत जाणून घेऊया..
सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल, मुंबईच्या पोषण आणि आहारशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. आयलीन कॅन्डे यांनी फळं धुण्याच्या योग्य पद्धतीबाबत मार्गदर्शन केले आहे.
फळं धुताना काय काळजी घ्यावी?
१) फळे आणि भाज्यांवर साबण, डिटर्जंट, ब्लीच सोल्यूशन्स किंवा इतर कोणत्याही निर्जंतुकीकरण उत्पादनांचा वापर करू नये.
२) तुमची फळे धुण्यासाठी वाहत्या पाण्याचा वापर करा. हातानेच किंवा अगदी मऊ कापडाने फळे घासून स्वच्छ करा.
३) सफरचंद, लिंबू, पेर, पेरू सारख्या टणक फळे घासू शकता. वाहत्या पाण्याखालील फळांच्या छिद्रांमधील घाण काढून टाकण्यासाठी स्वच्छ, मऊ ब्रश वापरू शकता
४) बेरी, चेरी, पीच आणि इतर प्रकारच्या मऊ फळांसाठी मात्र तुमच्या बोटांनीच स्वच्छता करा.
५) स्वच्छ धुतल्यानंतर फळ नीट सुकवून घ्या, साध्या मऊ कापडाचा वापर पुरेसा आहे त्यासाठी वेगळे ड्रायर वापरण्याची गरज नाही.
हे ही वाचा<< आलं महागलं! फ्रीजमध्ये ठेवून सुकवू नका, उलट ‘या’ जुगाडू टिप्स सह ठेवा फ्रेश, पैसेही वाचतील
६) फळे धुतल्यावर खूप वेळ तशीच ठेवू नका. जेव्हा तुम्ही खरोखरच फळ खाणार असाल तेव्हाच ते वाहत्या पाण्याखाली धरून स्वच्छ करा. कारण जेव्हा तुम्ही फळं धुवून तसेच ठेवता तेव्हा त्यावर पाण्यामुळे आणखी जंतू वाढण्याचा धोका असतो.