Aloe Vera Juice Health Benefits : प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या अभिनय आणि सौंदर्यासाठी जितकी प्रसिद्ध आहे, तितकीच ती तिच्या फिटनेससाठीही प्रसिद्ध आहे. वयाच्या ४७ व्या वर्षीही ३० वर्ष वयाची वाटणारी शिल्पा व्यायाम आणि आहाराला आपल्या रुटीनमध्ये खूप महत्त्व देते. शिल्पा शेट्टी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून कोरफडीचे फायदे सांगते. टॉपिकल जेल म्हणून ओळखली जाणारी कोरफड सनबर्नसाठी उपयुक्त असतेच; पण आरोग्याच्या कित्येक तक्रारींसाठी या जेलचा चांगला उपयोग होतो. या पोस्टमध्ये शिल्पा कोरफडीचे फायदे सांगत आपल्या चाहत्यांना महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करतेय.

शतकानुशतके कोरफड अविश्वसनीय उपचारात्मक गुणधर्म आणि नैसर्गिक फायद्यांसाठी ओळखले जाते. या चमत्कारिक वनस्पतीचा वापर त्वचेची जळजळ कमी करणे, पचनक्रिया सुधारणे व रोगप्रतिकार शक्ती वाढविणे यांसाठी केला जात आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, रिकाम्या पोटी कोरफडीचा रस प्ययाल्याने शरीरावर काय परिणाम होतो? ही साधी सवय तुमच्या दैनंदिन दिनचर्येत समाविष्ट करून, तुम्ही तुमच्या एकूण आरोग्य आणि कल्याणात मोठी प्रगती अनुभवू शकता. ऊर्जा वाढवण्यापासून ते डिटॉक्सिफिकेशनला मदत करण्यापर्यंत, कोरफडीच्या रसाचे असंख्य फायदे आहेत. चला तर मग रिकाम्या पोटी कोरफडीचा रस पिण्याचे कोणते आरोग्यदायी फायदे आहेत ते जाणून घेऊयात.

रिकाम्या पोटी कोरफडीचा रस पिण्याचे ५ अविश्वसनीय फायदे

१. पचनक्रिया सुधारते

कोरफडीचा रस प्यायल्याने जळजळ कमी होऊन पचनसंस्थेला आराम मिळतो आणि त्यामुळे तुमची पचनसंस्था नियमित सुधारण्यास मदत होते. जर्नल ऑफ न्यूरोगॅस्ट्रोएन्टेरोलॉजी अँड मोटिलिटीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, कोरफडीचा रस इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) च्या अल्पकालीन उपचारांमध्ये प्रभावी आणि सुरक्षित आहे. दररोज सकाळी हा रस प्ययाल्याने बद्धकोष्ठता, अतिसार व पोटदुखीपासून आराम मिळण्यासदेखील मदत होऊ शकते.

२. शरीरातील विषाक्त पदार्थ काढून टाकते

अॅलोव्हेराचा रस एक नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून काम करतो, शरीरातील विषारी पदार्थ व टाकाऊ पदार्थ काढून टाकण्यास मदत करतो. त्यातील समृद्ध अँटिऑक्सिडंट्सचे गुणधर्म ऑक्सिडेटिव्ह ताण आणि पेशींच्या नुकसानीपासून संरक्षण करण्यास मदत करतात. शरीराच्या नैसर्गिक शुद्धीकरण प्रक्रियेस समर्थन देऊन, कोरफडीचा रस पेशींच्या नुकसानीपासून संरक्षण करण्यास मदत करू शकतो. त्यामुळे एकूण आरोग्य सुधारू शकते.

३. त्वचेचे आरोग्य वाढवते –

सकाळी कोरफडीचा रस प्यायल्याने तुमच्या त्वचेला बळकटी मिळू शकते. या रसातील ए, सी व ई ही जीवनसत्त्वे निरोगी, चमकदार त्वचेला प्रोत्साहन देण्यास मदत करू शकतात. संशोधनात असे दिसून आले आहे की, कोरफडीचा रस मुरमांवरील उपचार, जळजळ कमी करणे आणि स्वच्छ त्वचेला प्रोत्साहन देणे यांसाठी प्रभावी ठरू शकतो. कोरफडीच्या रसाने तुमचा दिवस सुरू केल्याने तुम्हाला अधिक उजळ, अधिक तेजस्वी रंग मिळण्यास मदत होऊ शकते.

४. रोगप्रतिकार शक्ती –

कोरफडीचा रस अँटीऑक्सिडंट्सने भरलेला असतो, जो तुमच्या शरीराला मुक्त रॅडिकल्स आणि ऑक्सिडेटिव्ह ताणापासून वाचवतो. राष्ट्रीय आरोग्य संस्था (NIH)ने समर्थित केलेल्या संशोधनानुसार, कोरफडीचे इम्युनोमॉड्युलेटरी प्रभाव पांढऱ्या रक्तपेशींच्या उत्पादनास उत्तेजन देण्यास मदत करू शकतात, ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ही बाब तुमच्या शरीराला संक्रमण आणि रोगांशी अधिक प्रभावीपणे लढण्यास मदत करू शकते.

५. रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत –

संशोधनानुसार, कोरफडीचा रस रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकतो. जर्नल ऑफ क्लिनिकल फार्मसी अँड थेरप्युटिक्समधील एका पद्धतशीर पुनरावलोकन आणि मेटा-विश्लेषणात असे आढळून आले आहे की, कोरफडीचा सप्लिमेंटेशन प्री-डायबेटीज आणि टाईप २ मधुमेहाच्या रुग्णांमध्ये ग्लुकोज चयापचय सुधारू शकतो. त्यावरून असे सूचित होते की, कोरफडीचा रस पारंपरिक उपचारांसाठी उपयुक्त व पूरक असू शकतो.