Home Remedies for Kitchen Tiles: किचन हा घराचा तो भाग आहे, जिथे रोजच्या स्वयंपाकामुळे चविष्ट सुगंध पसरतो; पण त्याचबरोबर तेल-मसाल्याचे उडालेले शिंतोडे, चिकट डाग व ग्रीस टाइल्सवर घट्ट बसतात. कालांतरानं या टाइल्सवर पिवळसर डाग जमा होतात आणि किचनचं सौंदर्य कमी होतं. अशा वेळी बाजारातील महागडे केमिकल क्लीनर्स न वापरता, घरच्या घरी उपलब्ध असलेल्या सोप्या गोष्टींनी टाइल्सला नवा उजाळा देता येतो. पण कसं? चला जाणून घेऊ या काही भन्नाट उपाय, जे तुमच्या किचनला पुन्हा एकदा चमकदार बनवतील.

तुम्हाला वाटतं का की, तुमच्या किचनच्या टाइल्स पुन्हा कधीच चमकणार नाहीत? रोजच्या स्वयंपाकात उडणारे तेल-मसाले टाइल्सवर असे घट्ट बसतात की, कितीही क्लीनर वापरलं तरी डाग हलतच नाहीत. पण थांबा… एकदा हे ४ भन्नाट घरगुती हॅक्स वापरून बघा, मग टाइल्स कशा झळकतात ते पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

१. व्हिनेगरने करा स्वच्छ

टाइल्सवरचे तेलकट आणि मसालेदार डाग काढण्यासाठी व्हिनेगर एक उत्तम उपाय आहे. एका कापसावर व्हिनेगर लावा आणि थेट टाइल्सवर फिरवा. फक्त पाच मिनिटांनी स्क्रबरनं घासून घ्या आणि नंतर गार पाण्यानं ओलसर कापड टाकून पुसा. काही सेकंदांतच टाइल्स आरशासारखे चमकतील.

२. बेकिंग सोड्याचा चमत्कार

बेकिंग सोडा हा फक्त बेकिंगसाठी नाही, तर क्लीनिंगसाठीही उत्तम आहे. थोडंसं कोमट पाणी घ्या, त्यात बेकिंग सोडा मिसळून जाडसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट थेट टाइल्सवर लावा आणि स्क्रबरनं घासून घ्या. शेवटी गरम पाण्यात भिजवलेल्या कपड्यानं टाइल्स स्वच्छ करा. तुमच्या टाइल्स अगदी नव्यासारख्या दिसतील.

३. घरगुती क्लीनिंग स्प्रे

बाजारातील महागडे टाइल क्लीनर विसरा. घरच्या घरीच स्प्रे तयार करा. एका बाटलीत एक ग्लास व्हिनेगर, थोडासा बेकिंग सोडा व चिमूटभर डिटर्जंट पावडर मिसळा. हा स्प्रे टाइल्सवर मारून काही मिनिटांनी साफ करा. चिकटलेले ग्रीस आणि मसाल्याचे डाग सहज निघून जातील.

४. गरम पाणी + लिंबू + डिश वॉश

हा उपाय शेवटचा; पण सगळ्यात सोपा. कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि डिश वॉश मिसळा. ते द्रावण टाइल्सवर टाका आणि स्क्रबरने घासा. लिंबातील आम्लता आणि डिश वॉशची फेसाळणारी ताकद मिळून टाइल्स चमचमतील.

हे ४ उपाय एकदा करून बघा आणि बघता बघता तुमच्या किचनच्या टाइल्स नव्या सारख्या झळकताना पाहून तुम्हीही थक्क व्हाल.