Benefits of applying ice on face: महिला आपला चेहरा सुंदर करण्यासाठी अनेक महागड्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर करतात. तर कुणी चेहरा छान दिसावा आणि चेहऱ्यावर ग्लो यावा यासाठी बरेच उपाय करीत असतात. त्यातलाच एक उपया म्हणजे चेहऱ्यावर बर्फ लावणे. चेहऱ्यावर बर्फ फिरवल्याने अनेक प्रकारचे फायदे होतात. जर तुम्हाला चेहऱ्यावर बर्फ लावायचा असेल, तर काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून त्याचा पूर्ण फायदा होईल आणि चेहऱ्याचे कोणतेही नुकसान होणार नाही. चेहऱ्यावर बर्फाचा वापर केल्याने त्वचेचा ताजेपणा टिकतो, मुरमे कमी होतात आणि आरोग्यदायी त्वचा प्राप्त होते. पण, बर्फ चेहऱ्यावर किती वेळ आणि कसा लावायचे हे माहीत असणेही महत्त्वाचे आहे.

चेहऱ्यावर बर्फ लावण्याचे फायदे

१. थकवा कमी होतो

चेहऱ्याचा थकवा कमी होतो आणि त्वचा ताजीतवानी होते. चेहऱ्यावरील सूज कमी होते. बर्फामुळे चेहऱ्यातील रक्ताभिसरण सुधारते. त्वचा अधिक चमकदार दिसते.

२. मुरमे कमी होतात

पावसाळ्यात जास्त घाम आल्यामुळे त्वचेवरील छिद्रे बंद होतात आणि मुरमांची समस्या वाढते. अशा वेळी चेहऱ्यावर बर्फ फिरवल्याने सूज कमी होते आणि लालसरपणा कमी होतो. बर्फामुळे थंडावा मिळतो आणि मुरमांमुळे होणारा त्रास कमी होतो. बर्फ लावल्याने चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होतो, त्यामुळे नवीन मुरमे कमी होतात.

३. त्वचा राहते तरुण

चेहऱ्यावर बर्फ फिरवल्याने त्वचा तरुण दिसते. बर्फामुळे चेहऱ्यातील रक्तप्रवाह वाढतो आणि त्यामुळे त्वचेच्या नवीन पेशी तयार होतात. त्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. बर्फाचा वापर केल्याने त्वचा घट्ट राहते, छिद्रे कमी होऊन लहान होतात आणि सुरकुत्या दिसत नाहीत. म्हणूनच बर्फ हा त्वचेसाठी एक नैसर्गिक उपाय आहे, जो चेहरा ताजातवाना व तरुण ठेवतो.

चेहऱ्यावर बर्फ कसा लावायचा?

चेहऱ्यावर बर्फ वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवशयक आहे. बर्फ कधीही थेट चेहऱ्यावर लावू नये. कारण- त्यामुळे चेहऱ्याला त्रास होऊ शकतो. नेहमी बर्फाचा तुकडा स्वच्छ सुती कापडात गुंडाळूनच वापरावा. तो हलक्या हाताने चेहऱ्यावर फिरवावा आणि एका वेळी दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ तो चेहऱ्यावर फिरवू नये. दिवसातून जास्तीत जास्त ५ मिनिटेच बर्फ वापरणे योग्य ठरते. बर्फ नेहमी गोलाकार पद्धतीने फिरवला, तर त्याचा अधिक फायदा होतो.

बर्फ लावताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • बर्फ थेट त्वचेवर लावू नका.
  • बर्फ जास्त वेळ लावू नका, तुम्ही तो जास्तीत जास्त पाच मिनिटे लावू शकता.
  • अति थंडीत बर्फाचा त्वचेवर वापर करू नका.
  • त्वचेवर कोणत्याही प्रकारची जखम किंवा अॅलर्जी असल्यास बर्फ वापरू नका.