नवी दिल्ली : पोटातील काही धोकादायक जिवाणू नियमित पचनप्रक्रियेत अडथळे आणतात. हे जिवाणू अन्नशोषणाची क्षमता संपवतात. त्यामुळे व्यक्तीचा स्थूलपणा वाढतो. चयापचय क्रियेतही अडथळे येतात व आपल्या झोपेवरही दुष्परिणाम होतो. त्यामुळे शरीरासाठी अनुकूल जिवाणूंचे प्रमाण पोटात संतुलित प्रमाणात असावे. ते कमी होऊ देऊ नये. त्यामुळे पचनक्षमता चांगली राहून पोट निरोगी राहते, असे तज्ज्ञ सांगतात.

वाईट जिवाणूंचे प्रमाण वाढते तेव्हा..

आपल्या आतडय़ात चांगले आणि वाईट जिवाणू असतात. त्यातील संतुलन आपले आरोग्य ठरवते. ही सातत्याने सुरू असलेली प्रक्रिया आहे. सगळय़ा अवयवांचे काम सुरळीत चालण्यासाठी हे गरजेचे असते. जेव्हा वाईट जिवाणूंचे प्रमाण चांगल्या जिवाणूंच्या तुलनेत वाढते तेव्हा घातक द्रव्ये शरीरात प्रवेश करतात. त्यातले काही मेंदूत पोहोचतात व झोपेची प्रक्रिया व सवय बदलते.

यकृत विकार असणाऱ्यांत हे प्रमाण जास्त असते. आतडय़ात जी चरबी शोषून घेतली जाते तिच्या शोषणप्रक्रियेवर वाईट जिवाणू परिणाम करतात. 

संक्रमण का वाढते?

गर्भावस्थेतच बालकाच्या पोटात जिवाणू तयार होतात. बाहेरचे अन्नघटक जेव्हा शरीरात येऊ लागतात तेव्हा या दोन्ही जिवाणूंचे पोटातील संतुलन सुरू होते. पोटातील संसर्ग, स्थूलत्व, प्रतिजैवके (अँटिबायोटिक) सेवन व इतर आजारांमुळे चांगल्याच्या तुलनेत वाईट जिवाणू वाढीस लागतात. अन्नसेवनातून निर्माण होणाऱ्या आजारांतून रोगकारक जिवाणू शरीरात वाढतात. दूषित अन्नपाणी किंवा वन्यजीवांच्या संपर्कातूनही रोगकारक जिवाणूंचे संक्रमण आपल्या शरीरात होते.

तंतुमय धान्यामुळे लाभ..

चांगले जिवाणू विविध प्रकारचे अन्नघटकांचे पचन करून रसायनांची निर्मिती करतात. त्या रसायनांनी भूक भागल्याचे समजते. मात्र, वाईट जिवाणूंचे प्रमाण वाढल्यास भूक भागत नाही. व्यक्ती खात राहते व तिचे वजन वाढते. तंतुमय धान्याच्या आहाराने नको असलेली चरबी घटते. मात्र, प्राणिजन्य पदार्थातील प्रथिने आणि चरबी वाईट जिवाणूंचे प्रमाण वाढवतात.

चांगले जिवाणू वाढवण्यासाठी..

तज्ज्ञांच्या मते ‘योगर्ट’ आणि दह्यासारखे चांगल्या जिवाणूंचा समावेश असलेले अन्नसेवन केल्यास चांगले जिवाणू शरीरात वाढतात. आहारात प्रथिनांचे प्रमाण वाढवणे, तयार कबरेदकांपेक्षा नेहमीच्या प्रक्रियेतून तयार केलेल्या अन्नांतील कबरेदके व स्निग्ध पदार्थ सेवन करावे. जर यामुळेही चांगल्या जिवाणूंचे शरीरातील प्रमाण योग्यरीत्या न वाढल्यास तज्ज्ञ चांगले जिवाणू वाढीसाठी पूरक गोळय़ा देतात. रुग्णांनी वैद्यकीय सल्ल्यानेच ही औषधे घ्यावीत.

बाहेरच्या व असुरक्षित-अनारोग्यकारक अन्नाचे सातत्याने सेवन केल्यास वाईट जिवाणू पोटात वाढण्याची शक्यता आहे. योग्य व पौष्टिक आहार नियमित केल्याने चांगल्या जिवाणूंचे शरीरातील प्रमाण संतुलित राहते व वाईट जिवाणू वाढल्यास रोगप्रतिकारक शक्ती त्यांना रोखतात.