Sleep Increase Death Risk : तुमच्यापैकी अनेक जण रात्री उशिरापर्यंत जागे राहतात. कधी घरची कामं, तर मोबाईलवर तासन् तास टाइमपास करण्याच्या नादात रात्री उशिरा झोपण्याची सवय लागली आहे. पण, रात्री उशिरा झोपूनही अनेक जण सकाळी लवकर उठतात. त्यात सुट्यांच्या दिवसांत राहिलेली झोप पूर्ण करतात. परंतु, या झोपेच्या कालवधीसंदर्भात एका संशोधनातून फार धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. संशोधनात तुम्ही किती तास झोपता याचा थेट संबंध तुमच्या मृत्यूशी जोडण्यात आला आहे. सात तासांपेक्षा कमी आणि नऊ तासांपेक्षा जास्त झोपेची सवय यांमुळे मृत्यूचा धोका वाढतो, असा धक्कादायक खुलासा संशोधनातून करण्यात आला आहे. त्यामुळे झोप ही गोष्ट तुम्हाला सामान्य वाटत असली तरी ती जीवनातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे.
एक काळ असा होता की, जेव्हा रात्री उशिरापर्यंत जागणं, काम करणं, प्रकल्प पूर्ण करणं, बाळाला झोपवणं ही काम झोपेपेक्षा महत्त्वाची मानली जायची. तर दुसरीकडे उशिरापर्यंत झोपून राहणं हे आरामदायी आणि आळशीपणाचं लक्षण मानलं जातं. झोपेच्या याच सवयींवर संशोधकांनी अनेक दशके विविध देशांमधील ७९ गट अभ्यासांमधून निष्कर्ष एकत्रित केले आणि त्याचे निकाल फार चिंताजनक आहेत.
‘पबमेड’मध्ये प्रकाशित झालेल्या एका रिव्ह्यूनुसार, जे प्रौढ लोक रात्री नियमितपणे सात तासांपेक्षा कमी झोपतात, त्यांना शिफारस केलेल्या सात ते आठ तासांपेक्षा जास्त झोपणाऱ्यांच्या तुलनेत मृत्यूचा धोका १४ टक्के जास्त असल्याचे आढळून आले. तसेच जे लोक दररोज रात्री नऊ तास किंवा त्याहून अधिक झोपतात, त्यांच्यासाठी मृत्यूचा धोका ३४ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पुरुषांपेक्षा महिलांना जास्त वेळ झोपल्याने अधिक त्रास होतो.
तुमच्या शारीरिक विश्रांतीची वेळ तुमच्या शरीराच्या विविध कार्यांवर परिणाम करीत असते. हीच बाब लक्षात घेता, स्लीप फाउंडेशनने सुचवले की, झोपेमुळे शरीराला फक्त विश्रांतीच मिळत नाही, तर त्यामुळे इतरही अनेक फायदे मिळतात.
झोपेमुळे स्मरणशक्ती वाढते, मूड चांगला राहतो, चयापचय क्रिया सुधारते व हृदयाचे आरोग्य निरोगी राहते. झोपेच्या कमतरतेमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित होते, रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होऊ शकते आणि हृदयावर ताण येऊ शकतो.
तर दुसरीकडे, जास्त झोपेमुळेही शरीरात जळजळ आणि इतर समस्या निर्माण होतात. प्रत्येक शरीराची स्वतःची पद्धत असते; परंतु बहुतेक निरोगी व्यक्तींना रोज रात्री सात ते नऊ तास झोप आवश्यक असते. खूप कमी किंवा जास्त झोपेमुळे कालांतराने शरीरात गोंधळात टाकणारे संकेत दिसू शकतात.
चांगल्या झोपेसाठी ‘या’ ५ महत्वाच्या टिप्स
१) रोज झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा
रात्री झोपण्याची आणि सकाळी उठण्याची वेळ निश्चित करा, विशेषत: सुटीच्या दिवसांतही त्या वेळा पाळा, त्यामुळे तुमच्या शरीराला सवय होईल आणि शरीर निरोगी राहील.
२) रात्री उशिरापर्यंत मोबाईल, टीव्ही बघू नका
रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल, टीव्हीपासून लांब राहा किंवा इतर गॅझेट्सचा वापर करणं टाळा. शांत झोपेसाठी झोपण्यापूर्वी एक तास आधी या सर्व गोष्टी दूर ठेवा.
३) सूर्यस्नान घ्या
सकाळी फिरायला जा किंवा फक्त सूर्यप्रकाश असलेल्या खिडकीजवळ बसा. अशा सूर्यस्नानामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल आणि दिवसभर काम करण्यास चांगली ऊर्जा मिळेल.
४) दुपारच्या झोपेकडे लक्ष द्या
दुपारी एक छोटी झोप, ज्याला पॉवर नॅप, असे म्हणतात. दुपारच्या वेळी पॉवर नॅप ठीक आहे; पण खूप वेळ झोपून राहिलात, तर रात्री वेळेत झोप येणार नाही.