चांगली झोप येणे ही प्रत्येक माणसाची इच्छा असते. त्यातच चांगल्या आरोग्यासाठी कमीतकमी ७ ते ८ तास झोपण्याची शिफारस डॉक्टर नेहमी आपल्याला करत असतात. दरम्यान अपुर्या झोपेमुळे त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. अनेकांना वेळेवर झोप लागत नाही, यामुळे त्यांना सकाळी लवकर उठल्यावर थकवा जाणवतो, डोकेदुखी अशा अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे रात्री वेळेवर झोप येण्यासाठी काही सोप्या उपायांनी या समस्येपासून मुक्ती मिळवू शकतात. कोणत्या आहेत त्या सोप्या टिप्स जाणून घेऊयात…
रात्री उशिरापर्यंत झोप का येते?
काही लोकांना दिवसा झोपण्याची सवय असते, त्यामुळे ते रात्री खूप उशिरा झोपतात. काही जण रात्री उशिरापर्यंत मोबाइल वापरत असतात. ही अतिशय वाईट सवय आहे. कारण या सवयीमुळे तुमच्या झोपेवर दुष्परिणाम होत आहेत. काही जण मोबाइलवर गेम खेळत असतात किंवा एखादा सिनेमा/वेब सीरिज पाहत असतात. उशिरा रात्रीपर्यंत तुम्हाला झोप न येण्यामागील हे देखील मुख्य कारण असू शकते. यामुळे झोपण्यापूर्वी शक्यतो मोबाइल दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.
या ५ गोष्टींचा आहारात करा समावेश
रात्री लवकर आणि शांत झोप येण्यासाठी रात्रीच्या आहारात काही विशिष्ट पदार्थांचा समावेश करावा, असं तज्ज्ञ सांगतात. कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थांचं सेवन केल्यास झोप लवकर येते. यासाठी तुमच्या आहारात या पदार्थांचा समावेश करा.
व्हाईट राईस
व्हाईट ब्रेड
अननस आणि टरबूज
कुकीज आणि केक्स
बटाटे
लवकर झोप येण्यासाठी करा हे ३ उपाय
दिवसा झोपण्याची सवय सोडा
झोपेच्या कमतरतेवर मात करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत आवश्यक बदल करावे लागतील. दिवसा जास्त वेळ झोपू नका कारण यामुळे तुम्हाला रात्री झोपणे कठीण होईल. जर तुम्हाला खूप गरज वाटत असेल तर दिवसभरात फक्त अर्धा तास झोप घ्या.
वेळापत्रक तयार करा
जर तुम्हाला चांगली झोप हवी असेल तर तुम्ही तुमच्या कामाचे वेळापत्रक तयार करा. वेळापत्रकामध्ये सकाळी उठल्यानंतरची कामे ते रात्री झोपण्यापूर्वी कोणती कामे करायची आहेत, अशा प्रकारे सर्व माहिती नोंद करावी. यामुळे तुम्हाला स्वतःसाठी किती वेळ मिळणार आहे आणि त्यानंतर किती वेळानं झोपायचे आहे, याची स्पष्ट कल्पना तुम्हाला येईल. काही दिवस वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन केल्यास तुम्हाला आपोआपच वेळेत झोप येईल.
सतत वेळ पाहणे टाळा
काही लोकांना झोपताना वारंवार घड्याळाकडे पाहण्याची आणि झोपायला किती वेळ शिल्लक आहे याचा अंदाज घेण्याची सवय असते, असे केल्याने त्यांचा तणाव वाढतो आणि झोपही कमी होते.