Health and Fitness: बदाम हे त्याच्या असंख्य गुणधर्मांमुळे एक सुपरफूड मानले जाते. यामध्ये व्हिटॅमिन ई, फायबर, प्रथिने, निरोगी चरबी, मोनोसॅच्युरेटेड आणि पॉलिअनसॅच्युरेटेड चरबी, मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम, जस्त, तांबे आणि लोह यासह असंख्य पोषक घटक असतात. अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले बदाम हृदयाच्या आरोग्यासाठी, रक्तातील साखरेचे नियंत्रण करण्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर असतात. जेव्हा बदाम आपण रात्रभर पाण्यात भिजवून खातो तेव्हा त्याचे आरोग्याला फायदे अनेक पटीने वाढतात. महिनाभर भिजवलेले बदाम खाल्ल्याने तुमच्या शरीरात आणि मनावर आश्चर्यकारक बदल घडू शकतात. दररोज भिजवलेले बदाम खाल्ल्याने तुमच्या शरीरावर काय परिणाम होतात याबाबत जाणून घेऊ…
पचन सुधारते
भिजवलेल्या बदामांचे सेवन केल्याने पचन सुधारते, तुमचे शरीर त्यांचे पोषक घटक अधिक सहजपणे आणि कार्यक्षमतेने शोषण्यास मदत करते. बदामाचे कवच पचायला कठीण असते, म्हणूनच ते भिजवून खाल्ल्याने पचायला सोपे होतात. बदामाच्या सालीमध्ये टॅनिन नावाचा पदार्थ असतो. भिजवण्याच्या प्रक्रियेमुळे तो निघून जातो आणि लिपेससारखे एंझाइम सक्रिय होतात. त्यामुळे बदाम पचण्यास सोपे होतात. शिवाय पोटफुगी आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्यादेखील कमी होतात.
हृदयासाठी फायदेशीर
यूके मेडिकल वेबसाइट न्यूजच्या अहवालानुसार, बदामामध्ये व्हिटॅमिन ई असते, जो एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असतो. तो धमन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होण्यास कारणीभूत असलेल्या ऑक्सिडेशन प्रक्रियेला रोखण्यास मदत करू शकतो. या अहवालात अमेरिकन हॉर्ट असोसिएशनचाही उल्लेख करण्यात आला आहे की, बदामामध्ये असंतृप्त चरबी असते जी मर्यादित प्रमाणात खराब कोलेस्ट्रॉल सुधारू शकते.
त्यात २०१८च्या एका पुनरावलोकन अहवालाचाही उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये संशोधकांनी असे म्हटले आहे की, बदामातील पोषक तत्वे उच्च घनता लिपोप्रोटीन किंवा चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यास किंवा राखण्यास मदत करू शकतात. म्हणूनच संशोधन पथकाने हृदयाच्या संरक्षणासाठी दररोज बदाम खाण्याची शिफारस केली आहे.
पोषक तत्वांचे शोषण सुधारते
बदाम भिजवल्याने पोषक तत्वांची जैव उपलब्धता वाढते. भिजवलेल्या बदामांमध्ये आढळणारे व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, जस्त आणि लोह यासारखे महत्त्वाचे पोषक तत्व शरीराद्वारे चांगल्या प्रकारे शोषले जातात. एक महिन्याच्या आत, तुमच्या शरीराला या आवश्यक पोषक तत्वांचा फायदा होईल त्यामुळे तुमचे एकूण आरोग्य सुधारेल.
वजन कमी करणे आणि ऊर्जा वाढवणे
बदामांमध्ये फायबर, प्रथिने आणि निरोगी चरबीचे चांगले संतुलन असते. दररोज सकाळी भिजवलेले बदाम खाल्ल्याने तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटेल. यामुळे अनावश्यक खाणे टाळता येईल. त्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास किंवा नियंत्रित होण्यात मदत होईल. ते दिवसभर शाश्वत ऊर्जादेखील प्रदान करतात.
मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर
बदामांमध्ये असलेले रिबोफ्लेविन आणि एल-कार्निटाइन मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत. दररोज भिजवलेले बदाम खाल्ल्याने तुमची स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारू शकते.
त्वचा आणि केसांसाठी आरोग्यदायी
बदामांमध्ये व्हिटॅमिन ई सारखे अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह नुकसान टाळण्यास मदत करतात. मुक्त रॅडिकल्स वृद्धत्वाला गती देतात आणि अनेक जुनाट आजारांचा धोका वाढवतात. एक महिना बदाम खा आणि तुम्हाला एका महिन्यात तुमची त्वचा अधिक तेजस्वी आणि मऊ दिसेल. व्हिटॅमिन ई त्वचेला मॉइश्चराइज करते आणि अकाली वृद्धत्वाची लक्षणे टाळण्यास मदत करते.
