चिंतन
प्रिया वारियरचा डोळा मारतानाचा व्हिडिओ ज्या वेगाने व्हायरल झाला ते पाहता समाजमाध्यमांची ताकद तर लक्षात येतेच पण त्याचबरोबर काही गंभीर मुद्देही उपस्थित होतात.

प्रिया प्रकाश वारियर हे नाव घेतलं की ती कोण, कुठची अभिनेत्री आहे, तिच्या आगामी चित्रपटाचं नाव काय हे आठवण्यापेक्षा ‘अरे, ही तीच ना, भुवया उंचावणारी.. व्हायरल गाण्यातली नटी,’ असं उत्स्फूर्त उत्तर आपल्याला मिळतं. व्हायरल गाण्यातील नटी म्हणण्याचं कारण म्हणजे एक तर मल्याळम् भाषा सर्वानाच येते असं नाही आणि मुख्य म्हणजे त्या गाण्यापेक्षा प्रियाच्या भुवया उंचावणं तुलनेने जास्त व्हायरल झालं. त्यामुळे तिला कमालीची प्रसिद्धी मिळाली. मुळात ‘हे व्हायरल होणं म्हणजे काय रे भाऊ..’ हा प्रश्न अनेकदा आपल्या मनात घर करतो; किंबहुना व्हायरल प्रकरणाची सुरुवात कोण करत असेल, हा प्रश्नही पडत असतो, पण त्याचं उत्तर मात्र कोणाकडे सहजासहजी सापडत नसल्यामुळे सरतेशेवटी हा प्रश्न आल्या पावली निघून जातो.  व्हायरल होण्याचं वाढतं प्रमाण आणि त्याचा मानवाच्या दैनंदिन आयुष्यावर होणारा परिणाम पाहता हे व्हायरलचं गणित नेमकं आहे तरी कसं आणि त्यामागे समाजशास्त्र आणि मानसशास्त्राची काय भूमिका आहे, हे समजून घेणं आवश्यक आहे.

Ban on use of drones due to Prime Minister visit to Pune print news
पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यामुळे ड्रोन वापरण्यास बंदी
anti trafficking cells busted sex racket in pune
पुण्यात ३०२ क्रमांकाच्या खोलीत वेश्याव्यवसाय; पोलिसांनी टाकला छापा, ३ तरुणींची सुटका
Why did Lawrence Bishnoi gang fire outside Salman Khans house What is the extent of this gang
लॉरेन्स बिष्णोई टोळीने सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार का केला? या टोळीची व्याप्ती किती? पुन्हा हल्ला करण्याची धमकी किती गंभीर?
nashik, malegaon, clerk arrested, ration office, Accepting Bribe, Register Needy Families, Welfare Schemes, malegaon bribe case,
नाशिक : लाच स्वीकारताना कारकुनास अटक

आजच्या काळात समाजमाध्यमांच्या मदतीने आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत अगदी सहजपणे पोहोचू शकतो; पण मुळात गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज गेल्या काही वर्षांमध्ये विकसित झाली, असा तुमचा समज असेल तर तसं नाहीये. मुळात फार आधीपासून, अगदी मानवाच्या उत्क्रांतीपासून जसजसा काळ पुढे गेला तसतसा नवनवीन गोष्टींचा शोध लागत गेला. त्यातील एक महत्त्वाचा शोध म्हणजे भाषा.

भाषेची उत्क्रांती झाली आणि माणसं एकमेकांशी संवाद साधू लागली; पण त्या संवाद साधण्यावर काही मर्यादा होत्या. एका व्यक्तीचा आवाज, त्याच्या भावना या ठरावीक अंतरापलीकडे जाणं शक्य नव्हतं. त्यानंतरच्या काळात विविध तंत्रांच्या साहाय्याने हा आवाज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू लागला. पुढे विविध लिपी अस्तित्वात आल्या. त्यामुळे छापील गोष्टी त्या व्यक्तीच्या गैरहजेरीतही लोकांपर्यंत पोहोचू शकल्या; पण इथे मुद्दा असा होता की, लिखित मजकूर वाचण्यासाठी तो कागद किंवा ज्या गोष्टीवर ते लिहिलं आहे ते वाचकाच्या नजरेपर्यंत पोहोचण्याची गरज होती. तेव्हा मग वर्तमानपत्रं, पत्रकं यांच्या माध्यमातून या गोष्टी साध्य केल्या. ही गरज ओळखली गेली आणि त्याला तंत्रज्ञाची जोड मिळाली. उद्देश होता की लिपी वाचण्यासोबतच वाचक अमुक एका गोष्टीशी जोडली गेली पाहिजे. याला तंत्रज्ञानाची जोड मिळाली आणि कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त लोकांपर्यंत एखादी गोष्ट पोहोचवण्याचा ट्रेण्ड सुरू झाला.

यामध्ये ‘गेम थियरी’चा वापर सर्रास दिसून आला. या थियरीनुसार दोन व्यक्तींमध्ये एक प्रकारचा करार होतो.  विचार एकमेकांना सांगणं म्हणजेसुद्धा एक प्रकारचा करारच आहे. ज्यामध्ये गोष्टी समजून घेताना समोरची व्यक्ती तिच्या विचारशक्तीचा वापर करते आणि त्याचा सुवर्णमध्य साधला जातो. एखादी गोष्ट समजावण्याची आणि समजून घेण्याची पद्धत जितकी चांगली त्यावर ती इतरांपर्यंत प्रभावीपणे पोहोचेल की नाही हे ठरतं. समाजमाध्यमात एखादी गोष्ट व्हायरल होते तेव्हा त्यातील विचार हे काही अतुलनीय वगैरे नसतात; पण ते विचार इतरांपर्यंत पोहोचवण्याची संबंधित व्यक्तीची इच्छा असते. पण, तेव्हा तो विचार कोणाचा आहे, तो मी इतरांपर्यंत का पोहोचवावा, त्याविषयी माझं काय मत आहे, या निकषांवर ही गेम थियरी अवलंबून असते. एखाद्या गोष्टीत तर्कशुद्धपणा आहे म्हणून ती सर्वांपर्यंत पोहोचतेच असं नाही. त्यामुळे नंतर ती व्यक्ती या गोष्टींमध्ये व्यवहारबुद्धीचा वापर करते. एक प्रकारची वाटाघाट केल्यानंतर आपल्याला भावणाऱ्या  गोष्टींना प्राधान्य देत हे व्हायरल प्रकरण पुढे जातं.

एखाद्या गोष्टीविषयी इतकी चर्चा का होते, म्हणजेच हल्लीच्या भाषेत सांगायचं तर ती गोष्ट व्हायरल का होते, हा एक प्रश्न आहेच; पण यापूर्वीही गोष्टी व्हायरल होत होत्याच. अर्थात त्याला माहिती पसरवणं असं म्हटलं जायचं. मुळात ज्याप्रमाणे सर्वच गोष्टी व्हायरल होत नाहीत त्याचप्रमाणे उगाचच कोणत्याही गोष्टीची माहिती पसरायची नाही. यामागे एक सरळ गणित आहे. एखादी गोष्ट तुमच्या भावनेशी जोडली जाते, मनावर आघात करते किंवा मनाला हात घालते त्याच वेळी त्या गोष्टीची चर्चा होण्यास सुरुवात होते. या चर्चेतून काय घडलं, कसं घडलं, का घडलं कुणी घडवलं हे प्रत्येकाला समजून घ्यायचं असतं.  पूर्वीच्या काळात तंत्रज्ञान फारसं प्रगत नव्हतं; पण आता मात्र समाजमाध्यमांच्या माध्यमातून गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक तगडं तसंच साधं आणि सोपं साधन मानवाच्या हाती लागलं आहे, जिथे वर्तनाचं शास्रदेखील (बिहेविअरल सायन्स) महत्त्वाचं असतं. माणसाचा मेंदू एखादी गोष्ट खूप चांगली आणि प्रभावीपणे व्यक्त करू शकतो. एका पद्धतीने लोकांना तुमच्या मनातील बऱ्याच गोष्टी कळू शकतात.

समाजमाध्यमांमुळे लोकांच्या हाती सोपं आणि तितक्याच ताकदीचं साधन आलं आहे. तिथे एखाद्या व्यक्तीची गोपनीयता कायम ठेवत तिचा विचार जनसमुदायापर्यंत अतिशय प्रभावीपणे पोहोचवण्यात येतो. माहिती पसरवणं आणि व्हायरल होणं यात लोकांची मानसिकता काही वर्षांपूर्वी होती तशीच आहे. बदललं आहे ते फक्त तंत्रज्ञान. उदाहरणार्थ माणूस आधी दगडाने मारा करत होता, आता तो अणुबॉम्बने मारा करण्यासाठी सज्ज झालाय. त्यामुळे मानवाच्या वृत्तीत बदल झालेला नाही; पण संहारकतेत बदल झाला आहे. समाजमाध्यमातून व्हायरल होणाऱ्या गोष्टींमध्ये धर्मभेद, वर्णभेद, जातिभेद आणि काय करावे, काय करू नये या मुद्दय़ांवरून तणावाची परिस्थिती निर्माण करणाऱ्या गोष्टींचं प्रमाण जास्त असतं. ज्यामध्ये नाही म्हटलं तरीही काही गोष्टी या पूर्वनियोजित असतात. या गोष्टींकडे जरा नीट लक्ष दिलं तर अनेकांच्या ही बाब लक्षात येण्याजोगी आहे.

व्हायरलच्या या गणितात आणखी एक बाब महत्त्वाची असते, ती म्हणजे समाजमाध्यमांचं इंजिनीअरिंग. आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये होणारे बदल हे सर्वाधिक महत्त्वाचे असतात; पण त्यासोबतचं माध्यम ज्या पद्धतीने वापरलं जातं, हेसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. त्या माध्यमाचा सुयोग्य वापर होणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ आपले विचार इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’ या वृत्तपत्राचा वापर केला. हा त्यांनी केलेल्या माध्यमाचा उत्तम वापर होता. प्रसिद्ध सूत्रसंचालक जिम्मी किम्मेल यानेसुद्धा त्याच्या कार्यक्रमासाठी ‘क्राऊड सोर्सिग’चा वापर केला होता. एखादी लक्षवेधी गोष्ट ज्या वेळी लोकांना आपलीशी वाटू लागते किंवा ती लोकांच्या भावनांना व्यक्त होण्यासाठी संधी देते त्या वेळी ती व्हायरल होते. याअंतर्गत येणारा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रसिद्धी. प्रसिद्धी आणि व्हायरल गोष्टी हे समीकरण सहसा कलाविश्वात बऱ्याचदा पाहायला मिळतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘पिंक’ सिनेमाच्या प्रदर्शनाच्या वेळी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या नातीला लिहिलेलं पत्र. त्यानंतर काही दिवसांपूर्वी गाजलेला ‘पद्मावत’ चित्रपटाचा वाद. इथे लक्षात घेण्यासारखा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, वैयक्तिक स्वार्थासाठी आणि एखाद्याचं चारित्र्यहनन  करण्यासाठीही काही गोष्टी व्हायरल होतात किंवा केल्या जातात. सुनंदा पुष्कर आत्महत्या प्रकरण त्यापैकीच एक. दररोज किती आत्महत्या होतात, पण त्यातही सुनंदा पुष्कर आत्महत्या प्रकरण गाजलं त्यामागचं कारण होतं त्यात असणारं शशी थरुर यांचं नाव. त्यांच्या नावाभोवती असणारं वलय आणि त्याविषयी  सर्वसामान्यांमध्ये असणारं कुतूहल. या सर्व गोष्टींमुळे हे प्रकरण चर्चेत आलं, व्हायरल झालं. बऱ्याचदा यात प्रसिद्ध व्यक्तीशी जोडल्य गेलेल्या एखाद्या व्यक्तीमुळे ती गोष्ट बरीच चर्चेत येते. रोहित वेमुला प्रकरण काही वेगळ्या गोष्टी आणि निकषांचा आधार घेत चर्चेत आलं. रोहित वेमुला हा त्याच्या मृत्यूपश्चात एका वेगळ्या कारणाने प्रसिद्ध झाला. मुळात त्याच्यासोबत घडलेल्या घटनेमध्ये अनेकांनी स्वत:ला जोडलं होतं, त्या ठिकाणी एखाद्या आपल्या व्यक्तीला पाहिलं होतं, त्यामुळे हे प्रकरणही बराच काळ प्रकाशझोतात राहिलं. या साऱ्यामध्ये गेम थिअरी महत्त्वाची ठरते.

हल्लीहल्लीचं उदाहरण घ्यायचं झालं, तर ‘मी टू’ (#MeToo) हा हॅशटॅग. परदेशातून सुरू झालेला हा हॅशटॅग इतका ट्रेण्डमध्ये आला की, प्रत्येकानेच त्याविषयी काही ना काही बोलण्यास सुरुवात केली. त्यामुळे समाजमाध्यमातून वाईट आणि चांगल्या अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टी व्हायरल असतात. वास्तविक समाजमाध्यमं ही एक प्रकारची तलवार असून त्याचा वापर कसा करायचा हे आपण ठरवायचं असतं.

व्हायरलचं हे गणित सोडवताना आता आपण ज्या पायरीवर येऊन पोहोचलो आहोत, तिथून आपण प्रिया वरियरच्या चित्रफितीच्या व्हायरल होण्यामागची सूत्रं समजून घेऊयात. व्हॅलेंटाइन डे, प्रेमाने बहरलेलं वातावरण आणि त्या पाश्र्वभूमीवर नजरेने घायाळ करणारी ती मुलगी. ती कोण, कुठली काही ठाऊक नसतानाही अनेकांना भावली; पण नक्की काय भावलं याचा विचार केलाय का? प्रियाचे हावभाव, आपल्या शाळेतील आवडत्या किंवा प्रेम करत असणाऱ्या मुलाप्रति व्यक्त होण्याची तिची पद्धत आणि त्याचं असणारं वेगळेपण हे यामागचे महत्त्वाचे मुद्दे आहेत.

आपला समाज आणि काळ कितीही पुढे आला असला तरीही महिलांनी अशा प्रकारे व्यक्त होणं, प्रियकराला डोळा मारणं किंवा अशा प्रकारच्या काही बंडखोर कृती करणं यामुळे इतर अनेकांच्याच भुवया प्रिया वरियरपेक्षा जास्त उंचावतात, त्यांना वेगळ्या दृष्टीने विचार करायला भाग पाडतात. या सर्व गोष्टी या व्हिडीओमध्ये होत्या. त्यातही १४ फेब्रुवारीच्या पार्श्वभूमीवर जिथे काही ठिकाणी बऱ्याच स्वघोषित संस्कृतिरक्षक संघटनांनी प्रेमी युगुलांना विरोध करण्याचं सत्र चालवलं होतं, अशा वातावरणात हा व्हिडीओ व्हायरल झाला. ज्या ‘उरु अदार लव्ह’ या चित्रपटातील हे गाणं आहे, तो अतिशय कमी निर्मिती खर्चात तयार झालेला चित्रपट. मुळात तो मल्याळी चित्रपट. त्यामुळे तो इतर भारतीयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता तशी कमीच. तो व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीलाही हे असं काही तरी होईल याची तिळमात्र अपेक्षा नसावी. अशा परिस्थितीत हा व्हिडीओ म्हणजे प्रेमी युगुलांचा विरोध करणाऱ्या तथाकथित संस्कृतीरक्षक संघटनांना मिळालेली चपराक होती. कारण हा व्हिडीओ शेअर करत जणू काही मुलींचे बंडखोर विचारच प्रभावीपणे शेअर करण्यात आले आहेत. मुळात इथे प्रियाच्या सौंदर्याचा किंवा तिच्या नजरेचा मुद्दा नसून तिची प्रेमळ, पण हलकीशी बंडखोरीची झाक असलेली वृत्ती अनेकांना भावली आणि ती वृत्ती व्हायरल झाली. हा निष्कर्ष काढण्याचं कारण असं की, १४ फेब्रुवारीला मल्लिका-ए-हुस्न आणि बऱ्याच विशेषणांनी ओळखली जाणारी अभिनेत्री मधुबाला हिचा ८५ वा जन्मदिवस होता. तसं पाहिलं तर चाहत्यांसाठी, चित्रपट क्षेत्रासाठी आणि योगायोगाने समाजमाध्यमांसाठीही हा एक महत्त्वाचा दिवस होता. या पाश्र्वभूमीवर मधुबालाच्या चित्रपटांतील काही गाणी, तिच्या जीवनावरील व्हिडीओ व्हायरल होणार, अशी अनेकांची अपेक्षा होती; पण प्रत्यक्षात काय झालं, याचं चित्र आपल्यासमोर आहेच. बरं समाजमाध्यमांवर प्रिया तिच्या सौंदर्यामुळे व्हायरल होतेय, असं जे काही म्हटलं जात आहे त्यावर कितपत विश्वास ठेवावा हासुद्धा महत्त्वाचा प्रश्नच आहे. कारण मधुबाला प्रियाहून सर्वच बाबतीत उजवी. तर मग असं का व्हावं? प्रिया वरियरला अनेकांनी प्राधान्य देण्याचं एक कारण म्हणजे त्या व्हिडीओमध्ये दडलेली बंडखोर वृत्ती, व्हॅलेंटाइन डेला होणारा विरोध आणि त्याच पाश्र्वभूमीवर टिच्चून प्रदर्शित करण्यात आलेला हा अफलातून व्हिडीओ. या व्हिडीओतून तरुणाईला प्रेम व्यक्त करण्याची न मिळालेली मुभा, तिची घुसमट आणि अव्यक्त राग या गोष्टी व्यक्त झाल्या आहेत. आणि एकमेकींना पूरक ठरल्या आहेत. याच चित्रपटातील ‘मानिक्य मलरया पूवी’ हे गाणं व्हायरल होत असताना त्यामागे समाजमाध्यमं, तंत्रज्ञान, सामाजिक परिस्थिती हे घटक तर महत्त्वाचे होतेच; पण इथे केंद्रस्थानी होती ती म्हणजे बंडखोर वृत्ती आणि ती सादर करण्याची अनोखी पद्धत.

हे व्हायरल प्रकरण मुळात आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे, असं वक्तव्य अनेक जण करतात. किंबहुना त्याचा आपल्या आयुष्यावर चुकीचा किंवा नकारात्मक परिणाम होतो, असंही म्हटलं जातं. मानवी संवादात बोलणं, ऐकणं हे महत्त्वाचं असतं; पण समाजमाध्यमांवर मात्र देहबोलीचा अभाव पाहायला मिळतो. त्यासोबतच व्याकरणही या माध्यमातून संवाद साधताना फारसं महत्त्वाचं ठरत नाही. गोष्टी कमीत कमी शब्दांमध्ये मांडण्याला प्राधान्य दिलं जातं. शॉर्टफॉम्र्स आणि इमॉटिकॉन्समुळे शब्दांचा वापर कमी होतो. त्याचे परिणाम माणसाच्या विचारांवर, अभिव्यक्तींवर कसे होणार याविषयी तर्क व्यक्त करणं हे सध्या तरी कठीण आहे. अल्बर्ट आइनस्टाइनच्या मते ‘तंत्रज्ञानाचा वापर अशा प्रकारे तरुणाईच्या मनात घर करून बसला आणि संपूर्ण संवाद तंत्रज्ञानाने झाला तर जगात मूर्खाची पिढी असेल’. अर्थात याबाबत दुमत असू शकतं. पण एक नक्की, समाजमाध्यमाच्या वापरामुळे कुटुंबातील संवाद कुठे तरी कमी झाला आहे. पुढच्या पिढीला चर्चा, वाद, संवाद याबद्दल घरांतून मार्गदर्शन मिळतं आहे की नाही, याबद्दल संदेह आहे.

प्रत्यक्ष समाजमाध्यमं वापरताना होणाऱ्या चुका या कालांतराने विसरल्या जातात; पण समाजमाध्यमामध्ये व्यक्त झाल्यानंतर मिळालेला समाजाचा नकारात्मक प्रतिसाद हा त्या व्यक्तीच्या डिजिटल मेमरीमध्ये सततचा कोरला जातो आणि म्हणून त्याची डिजिटल मेमरी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात कायम राहते.

वाचा आणि श्रुती या दोन्ही गोष्टींना मानवी आयुष्यात महत्त्वाचं स्थान आहे. पण, समाज माध्यमांवर मात्र या गोष्टी काहीशा डावलल्या जातात. इथे जास्तीत जास्त संवाद हा लिखित स्वरूपात होतो. एखाद्या गोष्टीवर व्यक्त होण्यासाठीसुद्धा हल्ली इमोटिकॉन्स (चिन्हांचा) वापर सर्रास केला जातो. त्यामुळे इथे भावनांचा अभाव प्रकर्षांने जाणवू लागला आहे. काहींच्या मते भावना आणि नातेसंबंधांवरही या साऱ्याचा परिणाम होत असून, प्रेम व्यक्त करण्यात भावना कुठे तरी कमी पडू लागल्या आहेत. मुळात काय, तर समाजमाध्यमांच्या माध्यमातून तुम्ही किती गोष्टीविषयी व्यक्त होताय, काय मतप्रदर्शन करताय या साऱ्याची एक डिजिटल मेमरी तयार होते. पुढे काही वर्षांनी ज्या वेळी तुमचं आयुष्य बदललेलं असेल तेव्हा काही गोष्टी आपोआपच तुमच्या मेंदूतून-स्मृतीतून निघून जातील, पण, त्याची डिजिटल मेमरी कोणत्या न कोणत्या स्वरूपात कायम राहील हे नक्की. त्यामुळे समाजमाध्यमाचा वापर पाहता या माध्यमाचा मानवी आयुष्यवर नेमका कसा आणि किती परिणाम होतो, हे सांगण तसं कठीणच. या माध्यमातून व्यक्त होणं हासुद्धा एक अभिव्यक्तिस्वातंत्र्याचाच भाग आहे. फरक फक्त इतकाच आहे की, येथे गोष्टी लोकांपर्यंत पोहोचताना त्यांना कोणत्याच प्रकारची चााळणी लावली जात नाही. पूर्वी ही अभिव्यक्ती ज्या माध्यमातून व्हायची त्या माध्यमांवर काही माणसांचं नियंत्रण होतं. पण, समाजमाध्यमांमध्ये असं नियंत्रण शक्य नाही. कदाचित लोकांची समाजमाध्यमं वापरण्याची समज जसजशी वाढच जाईल तसा, या माध्यमांचा जनता जास्त विवेकबुद्धीने वापर करेल.
(शब्दांकन- सायली पाटील) – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा