Side Effect On Eating Stale Poli Chapati : आजही अनेकांच्या घरी शिळी पोळी खाणं ही एक सामान्य गोष्ट आहे. अनेकांना सकाळी चहा, दूध किंवा गुळासह शिळी पोळी खायला आवडते; पण अनेकांच्या घरात शिळी पोळी दुसऱ्या दिवशी फेकून दिली जाते. पण काहींच्या मते, शिळी पोळी खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असते; तर काही जण शिळी पोळी आरोग्यास हानिकारक असल्याचे मानतात. पण, शिळी पोळी खरंच फायदेशीर असते की हानीकारक याविषयी आपण आहारतज्ज्ञ श्रेया गोयल यांच्याकडून जाणून घेऊ…
आहारतज्ज्ञ श्रेया गोयल यांच्या मते, अनेक भारतीय घरांमध्ये शिळ्या पोळ्या खाणं सामान्य आहे. बरेच लोक आदल्या दिवशी किंवा सकाळी बनवलेली पोळी न संपल्यास संध्याकाळी फेकून देतात किंवा बहुतेक जण ती गाईला खायला देतात. काही लोक शिळ्या पोळीपासून काही स्वादिष्ट पदार्थ बनवून खातात. या पार्श्वभूमीवर शिळ्या पोळीचे फायदे-तोटे खालीलप्रमाणे : –
शिळी पोळी खाण्याचे फायदे – तोटे जाणून घ्या
१) पचनक्रियेत सुधारणा
शिळी पोळी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. शिळ्या पोळीत ताज्या पोळीपेक्षा जास्त फायबर असते. कारण- ती थोडी सुकलेली असते. त्यामुळे ती सहजपणे पचते आणि बद्धकोष्ठता किंवा गॅससारख्या समस्यांपासून आराम मिळतो. शिळी पोळी खाल्ल्याने पचनसंस्था सुधारू शकते.
२) उष्णता कमी होण्यास मदत
आयुर्वेदानुसार, शिळी पोळी खाल्ल्याने शरीर थंड राहते. ती खाल्ल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. म्हणूनच उन्हाळ्यात थंड दूध किंवा दह्यासोबत शिळी पोळी खाण्याची परंपरा आहे.
३) रक्तशर्करावाढीच्या वेगात घट
शिळ्या पोळीमधील स्टार्च आधीच विघटित झालेला असतो, ज्यामुळे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स थोडा कमी होतो. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, जर मधुमेहाच्या रुग्णांनी शिळी पोळी खाल्ल्यास त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी ताजी पोळी खाल्ल्यानंतर जितक्या वेगाने वाढते, तितक्या वेगाने वाढणार नाही.
४) शिळ्या पोळी खाण्यामुळे ‘हे’ नुकसान
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, एका दिवसापेक्षा जास्त आधी बनवलेल्या पोळ्या खाऊ नयेत. एक दिवसापेक्षा जास्त शिळी पोळी खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. कारण- त्यात एक दिवसापेक्षा जास्त दिवसांमुळे हानिकारक जीवाणू आणि बुरशी यांची वाढ होऊ शकते. अशा परिस्थितीत, शिळी पोळी खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे पोटदुखी, अॅसिडिटी, अपचन आणि कधी कधी विषबाधादेखील होऊ शकते.