पोटातील जिवाणूंमध्ये होत असलेले बदल हे पार्किन्सन म्हणजे कंपवाताला कारण ठरतात व त्यामुळे मोटर स्कील्स हे मेंदूचे विशिष्ट कार्य बिघडते. पार्किन्सनचा आजार जगात १ कोटी लोकांना असून तो मेंदूच्या ऱ्हासाचा दुसऱ्या क्रमांकाचा रोग आहे. कंपवातात हातपाय कंप पावतात. चालता येत नाही. अल्फा सायन्युक्लीन हे प्रथिन आक्रमक ठरते व ते पोटातही असते. सायटोकिन्स हे रेणू मेंदूत हानी निर्माण करीत असतात. पार्किन्सनच्या ७५ टक्के रुग्णांना गॅस्ट्रोएन्ट्रीटिसचा त्रास असतो व बद्धकोष्ठता असते. आपल्या आतडय़ात वेगवेगळ्या प्रकारचे हानिकारक व उपकारक जिवाणू असतात व त्यांचा एक मायक्रोबायोमच असतो. तो प्रतिकारशक्ती व चेतासंस्थेच्या विकासासाठी महत्त्वाचा असतो, असे कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीचे सार्किस मझमनियन यांनी सांगितले. गॅस्ट्रोइंटेस्टेनल समस्यांमुळे नंतरच्या काळात मेंदूचे रोग होतात व काही ठिकाणी त्यात पर्यावरणीय कारणे असतात. पण जिवाणूंचा त्याच्याशी संबंध असतो. संशोधकांनी उंदरांमध्ये अल्फा सायन्यूक्लीन हे प्रथिन वाढवले असता त्यात कंपवाताची लक्षणे दिसली. काही उंदरांच्या पोटात जिवाणू होते, तर काहींच्या पोटात ते नव्हते अशा दोन गटात हे प्रयोग करण्यात आले. जिवाणू नसलेल्या उंदरांनी पूर्ण मायक्रोबायोम असलेल्या उंदरांपेक्षा चांगले काम केले. मायक्रोबायोम नसेल तर सायन्यूक्लीन प्रथिन असले तरी उंदरांमध्ये मेंदूशी निगडित कौशल्ये बिघडत नाहीत. पोटातील जिवाणू हे अन्नातील चोथ्याचे विघटन करतात. त्यात अ‍ॅसिटेट व ब्यूटीरेट ही मेदाम्ले तयार होतात. हे रेणू मेंदूत प्रतिकारशक्ती प्रतिसाद वाढवतात असे मानले जात होते, पण उंदरांना मायक्रोगेलिया दिल्यानंतर त्यांच्यातील न्यूरॉनचे कार्य बिघडले. पण जिवाणूमुक्त उंदरांना मायक्रोगेलिया पेशी दिल्यानंतर त्यांच्या मेंदूचे कार्य बिघडले. सेल या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)