माणसाची स्मृती ही एक प्रकारची दैवी देणगी आहे. पहिल्या भेटीतील प्रेम वगैरे असते असे आपण मानतो, पण तो एक भ्रम आहे. वैज्ञानिकांच्या मते माणसाची स्मृती सतत भूतकाळ परत बदलून नवीन नोंदी करीत असते. नवीन अनुभवांच्या आधारे भूतकाळातील घटना ताडून पाहिल्या जातात व त्यातील योग्य त्याच ठेवल्या जातात. आपली स्मृती काळाबरोबर प्रवास करीत असते व वर्तमानातील काही तुकडे ती भूतकाळातील आठवणींमध्ये जोडत असते. तुम्हाला जुन्या आठवणी येतील पण त्यांचे संदर्भ बदलले असतील कारण यात चालू माहितीच्या आधारे स्मृती परत लिहिली जात असते. आपण म्हणतो पहिल्या नजरेत प्रेम जडले पण ती स्मृतीची गुगली असते, जेव्हा तुम्ही त्याला किंवा तिला कुठे भेटला होतात हे पुन्हा आठवता तेव्हा प्रेम अतिउत्साहाच्या भावना दाटून येतात, असे नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटी फेनबर्ग स्कूल ऑफ मेडिसिन या संस्थेतील वैद्यकीय समाज विज्ञान विभागाच्या डोना जो ब्रिज यांनी सांगितले. तुम्ही दुसऱ्या वेळी तुमच्या मनातील आताच्या भावना त्या व्यक्तीच्या पहिल्या भेटीच्या प्रसंगावर लादत असतो. स्मृती कशी चुकीची असते व ती कशी हळूच नवीन गोष्टींचा समावेश भूतकाळातील करीत असते. जेव्हा आपण पुन्हा त्या स्मृतींना उजाळा देतो तेव्हा वेगळेच काहीतरी आठवते. नवी माहिती स्मृतीमध्ये कशी घुसखोरी करते हे समजत नाही, पण नेहमी बदलणाऱ्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी कदाचित स्मृतींमध्ये हे बदल स्वीकारले जात असतील. आपली स्मृती ही व्हिडिओ कॅमेऱ्यासरखी नसते. आपल्या स्मृतीत अनेक चौकटी तयार केल्या जातात. सुधारल्या जातात, संपादित केल्या जातात. तुमच्या आजच्या जगाशी साजेशी आठवण ठेवली जाते. हिपोकॅम्पस भागात स्मृतींचे संपादन चालते. येथे हिपोकॅम्पस हा फिल्म एडिटरचे काम करतो व त्याला काही खास परिणाम (स्पेशल इफेक्ट ) देतो. १७ पुरुष व महिला यांच्यावर १६८ ठिकाणे संगणकाच्या पडद्यावर दाखवून हे प्रयोग करण्यात आले. या सहभागी व्यक्तींना मूळ ठिकाण ओळखण्यास सांगण्यात आले, पण पाश्र्वभूमी बदललेली असल्याने ते गडबडले. त्यांनी पर्याय निवडताना आता त्यांच्या मनात जी पाश्र्वभूमी होती त्यावर त्या वस्तू असतानाच्या चित्रांची निवड केली याचाच अर्थ जुन्या स्मृतीत नवीन माहितीची सरमिसळ झाली होती असे ब्रिज यांचे मत आहे. न्यूरोसायन्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Feb 2014 रोजी प्रकाशित
गाथा स्मृतीबदलाची!
माणसाची स्मृती ही एक प्रकारची दैवी देणगी आहे. पहिल्या भेटीतील प्रेम वगैरे असते असे आपण मानतो, पण तो एक भ्रम आहे. वैज्ञानिकांच्या मते माणसाची स्मृती सतत भूतकाळ परत बदलून नवीन नोंदी करीत असते.
First published on: 15-02-2014 at 03:38 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story of memory loss