उन्हाळा म्हटलं की कडक ऊन, घशाला पडलेली कोरड हे सारं आलंच. त्यात अंगाची होणारी लाही लाही आणि घामाने सर्वच हैराण झालेले असतात. या काळात मानवी शरीरातील पाण्याचं संतुलन योग्य प्रमाणात ठेवणं गरजेचं असतं. रोज जवळपास ८ ते १० ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे. या दिवसात उन्हामुळे डिहायड्रेशनची समस्य़ा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घशाला पडलेली कोरड दूर करण्यासाठी प्रत्येक जण थंड पेयांकडे वळतो. मात्र भारतीय पारंपरिक पेयं नुसती घशाची कोरड दूर करत नाहीत तर उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यास मदत करतात.
- बेल पन्ना- उन्हाळ्यात ओडिशात सर्वाधिक लोकप्रिय पेयं आहे. कवठ फळ किंवा बेल फळ यांचा गर काढून पिकलेल्या आंब्याच्या गरात मिसळलं जातं. त्यात वाटलेला नारळ, साखर, दूध दही, मिरपूड आणि वेळची पावडर टाकून पाण्यासोबत मिक्स केलं जातं. हे पेय थंड करून पिलं जातं.
- कुलुक्की- हे केरळातील उन्हाळी पेय आहे. तुळशीच्या बिया वापरून हे पेयं तयार केलं जात. लिंबू, हिरव्या मिरच्या, आलं, साखर आणि बर्फ टाकून हे पेय तयार केलं जातं.
- पनकम– हे पेय तामिळनाडूत सर्वाधिक लोकप्रिय आहे. उन्हाळ्यात या पेयाला सर्वाधिक पसंती दिली जाते. गुळ, सुंठ पावडर, वेळची पावडर, लिंबाचा रस आणि काळीमिरी टाकून हे पेय तयार केलं जातं.
- सोलकढी- महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर सर्वाधिक पिलं जाणारं पेय आहे. शरीराचं तापमान आणि अपचन टाळण्यासाठी या पेयाला पसंती दिली जाते. सोलकढीत चवीनुसार हिंग, कडीपत्ता, आलं आणि जिरे टाकलं जातं.
- टांका तोरणी- हे ओडिशातील मसालेदार पेय आहे. एक ते तीन आंबलेल्या तांदळाच्या पाण्यापासून तयार केलं जातं. यात पुदीनाची पाने, खडा मीठ, दही, लिंबाचा रस, हिरव्या मिरच्या आणि लिंबाची पानं घातली जातात.
- जिगरथंडा- तामिळनाडूतील आणखी एक ग्रीष्मकालीन पेय आहे. जिगरथंडा दूध, बदाम डिंक, साखर, आईस्क्रीम आणि सरसापरीला सिरपपासून बनविला जातो. या पेयात दाहकविरोधी गुणधर्म आहेत.
- बुरंश- उत्तराखंडमधील ग्रीष्मकालीन पेय असून याची चव आंबड गोड असते. रोडोडेंड्रॉन फुलांच्या पाकळ्यापासून हे पेय तयार केलं जातं.
- ओवरनाइट लेमोनेड- लिंबू पाणी सकाळी पिणं आरोग्यासाठी चांगलं असतं. पाण्यात लिंबाचा रस, चिमूटभर मीठ आणि सेंद्रीय गुळ किंवा साखर टाकून हे पेय तयार केलं जातं. रात्रभर हे पेय तसंच ठेवून सकाळी घेतल्यास आरोग्याला चांगलं असतं.
- इतर उन्हाळी पेयं- ताक, लस्सी, नारळ पाणी, पुदिन्याचा रस, जलजीरा, कैरी पन्ना, ताज्या फळांचा रस यामुळेही उन्हाची दाहकता कमी करण्यास मदत होते