सध्या सर्वच जण उन्हाच्या काहिलीने हैराण झाले आहेत. अनेक भागांमध्ये तापमान ४५ डिग्रीपर्यंत पोहोचले आहे. वाढत्या तापमानामुळे उन्हाळयात नागरीकांना विविध शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. जास्त वेळ उन्हात रहावे लागल्यास अपचन, थकवा जाणवतो. त्यामुळे डॉक्टर रुग्णांना जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला देतात. उन्हाळयात असे त्रास होऊ नयेत यासाठी आपण काही गोष्टी जाणून घेऊया.
– बाहेर तापमान जास्त असल्यास शक्य तो उन्हातून प्रवास टाळा. उन्हापासून बचावासाठी छत्री घेऊन घरा बाहेर पडा. सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत उन्हातून प्रवास टाळा.
– शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य राखणे आवश्यक असते. त्यामुळे उन्हात बाहेर पडण्याआधी जास्तीत जास्त पाणी प्या. हिवाळयाच्या तुलनेत उन्हाळयात शरीराला ५०० मिलीलीटर जास्त पाण्याची आवश्यकता असते.
– जास्तीत जास्त शरीर झाकून बाहेर पडा. तुम्हाला उष्म्याचा नेहमीच त्रास होत असेल तर कांदा जवळ बाळगा. टोपी, गॉगल, सनस्क्रीनचा वापर करा.
– उन्हाळयात जड अन्नपदार्थांऐवजी थंड पाणी, लिंबू सरबत, कैरीचे पन्ह, फळांचा रस, ताक, लस्सी यांचे जास्त प्रमाणात सेवन करा. यामुळे तुमच्या शरीरात ऊर्जा टिकून रहाते.
– उन्हाळयात व्यायाम करताना सतत घाम येत असल्यामुळे थकवा जाणवू शकतो. त्यामुळे शरीराला ताण देणाऱ्या व्यायामाऐवजी हलका व्यायाम, योगावर भर द्या.