Healthy breakfasts: आजकाल प्रत्येकाला दीर्घ आणि आरोग्यदायी आयुष्य जगण्याची इच्छा असते. परंतु, त्यासाठी फक्त औषधे किंवा उपचार पुरेसे नाहीत, तर आपल्या जीवनशैलीत बदल करणेही खूप महत्त्वाचे आहे. योगा, व्यायाम, संतुलित आहार व पुरेशी झोप या गोष्टी वृद्धापकाळाची गती संथ करण्यास मदत करतात. तसेच नाश्त्यामध्ये योग्य आहार घेणेही विशेष महत्त्वाचे ठरते. सकाळचा नाश्ता म्हणजे दिवसाची सुरुवात आणि शरीराला ऊर्जा मिळवण्याची संधी. योग्य पदार्थांचा समावेश केल्यास शरीराला आवश्यक ते पोषण मिळते. त्यामुळे स्नायू मजबूत राहतात आणि त्वचा दीर्घकाळ निरोगी व तरुण दिसते. मग जाणून घेऊया सकाळच्या नाश्त्यासाठी कोणते पदार्थ आरोग्यासाठी आणि अँटी-एजिंगसाठी उपयुक्त आहेत.

१. प्रोटीनयुक्त नाश्ता

सकाळच्या नाश्त्यात प्रोटीन असणे फार महत्त्वाचे आहे. प्रोटीनमुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते आणि मांसपेशींची मजबुती वाढते. त्यासाठी तुम्ही आहारात अंडी, नट्स, दही यांचा समावेश करू शकता. अंड्यातील प्रोटीन शरीरासाठी आवश्यक अॅमिनो अॅसिड्सचा पुरवठा करते आणि नट्समध्ये आरोग्यदायी चरबी आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. तसेच पालक, टोमॅटो यांसारख्या भाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर मुबलक प्रमाणात असते. हे पदार्थ त्वचेच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत. त्यामुळे त्वचा दीर्घकाळ तरुण दिसते आणि वृद्धापकाळाच्या चिन्हांपासून संरक्षण मिळते.

२. संपूर्ण धान्याचा समावेश

सकाळच्या नाश्त्यात संपूर्ण धान्य किंवा होल ग्रेन घेणे अत्यंत आवश्यक आहे. जसे की ओट्स, ब्राउन ब्रेड, क्विनोआ इत्यादी. संपूर्ण धान्य शरीराला पूर्णपणे पोषण देते आणि शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवते. नेचर फूडच्या संशोधनानुसार, नियमितपणे संपूर्ण धान्याचे सेवन केल्यास जीवनाचा कालावधी ९-१० वर्षांनी वाढतो. त्याशिवाय, हृदयविकार, डायबेटीस, आणि पचनसंस्थेशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी होतो.

३. फायबर व व्हिटॅमिन्स

सकाळच्या नाश्त्यात फळे आणि भाज्यांचा समावेश करणे खूप महत्त्वाचे आहे. फायबरमुळे पचन सुधारते; तर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात. बेरीज, सफरचंद, केळी यांसारख्या फळांचे सकाळी सेवन करण्यामुळे शरीराला आवश्यक ते पोषण मिळते आणि त्वचेतील हायलुरॉनिक अॅसिड संतुलित राहते, ज्यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार दिसते.

४. हेल्दी फॅट्सचा समावेश:

अँटी-एजिंगसाठी शरीराला हेल्दी फॅट्सची गरज असते. अक्रोड, बदाम, फ्लॅक्ससीड यांसारखे पदार्थ सकाळच्या नाश्त्यात घेतल्यास मेंदूला ऊर्जा मिळते आणि त्वचा व हाडे मजबूत राहतात.