जर तुमच्याकडेही टाटा मोटर्सचे व्यावसायिक वाहन असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाचे वृत्त आहे. ज्या व्यावसायिक वाहनांची वॉरंटी लॉकडाउन दरम्यान संपणार आहे किंवा संपली आहे, अशा ग्राहकांना कंपनीने दिलासा दिला आहे.
कंपनीने आपल्या व्यावसायिक वाहनांच्या वॉरंटीमध्ये दोन महिन्यांची वाढ केली आहे. म्हणजे 3 मेपर्यंत जर तुमच्या गाडीची वॉरंटी संपली तरीही तुम्हाला दोन महिन्यांची अतिरिक्त सवलत मिळेल. “करोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर टाटा मोटर्सने जगभरातील आपल्या सर्व व्यावसायिक वाहनांच्या वॉरंटीमध्ये दोन महिन्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे”, असे कंपनीकडून एका निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले.
याशिवाय व्यावसायिक वाहन सेवा विस्तारीकरणाचा भाग म्हणून टाटा मोटर्स भारतातील त्यांच्या ग्राहकांसाठी खालील लाभ देखील देत आहे :
- राष्ट्रीय लॉकडाउन कालावधीदरम्यान नियोजित असलेल्या पूर्वीच्या मोफत सर्विसेससाठी दोन महिन्यांची वाढ
- राष्ट्रीय लॉकडाउन कालावधीदरम्यान वॉरंटी संपणा-या ग्राहकांसाठी वॉरंटी कालावधीमध्ये दोन महिन्यांची वाढ
- राष्ट्रीय लॉकडाउन कालावधीदरम्यान मुदत संपणा-यांसाठी टाटा सुरक्षा एएमसीमध्ये वाढ
- टाटा मोटर्स सुरक्षामधील सर्व सक्रिय करारांसाठी एक महिन्याची वैधता वाढ
- राष्ट्रीय लॉकडाउन कालावधीदरम्यान नियोजित एएमसी सेवा लाभ घेण्यासाठी ग्राहकांसाठी एक महिन्याची वाढ
- राष्ट्रीय लॉकडाउन कालावधीदरम्यान सरकारने दिलेल्या आदेशानुसार आवश्यक वस्तूंची ने-आण करणा-या ट्रक्ससाठी टाटा मोटर्स हेल्पलाइन, टाटा सपोर्ट क्रमांक – १८०० २०९ ७९७९ देखील सक्रियपणे सुरू.