पावसाळा सुरू होताच डासांचा त्रास झपाट्याने वाढतो. विशेष म्हणजे संध्याकाळी आणि रात्री डास जास्त चावतात. त्यामुळे खाज, लालसरपणा असा त्रास वाढतो. पण काही घरगुती सोप्या उपायांनी तुम्ही डासांना सहज दूर ठेवू शकता आणि चावल्यावर होणारा त्रास ही कमी करू शकता.
राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस पडत असल्याने डासांचा त्रास वेगाने वाढत आहे. ओलसर वातावरण, साचलेले पाणी आणि स्वच्छतेचा अभाव यामुळे डासांची पैदास झपाट्याने होते. डास चावल्यामुळे खाज, जळजळ तर होतेच, पण डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया सारख्या गंभीर आजारांचाही धोका निर्माण होतो. विशेष म्हणजेे लहान मुलं आणि वयोवृद्ध व्यक्तींना या आजारांचा धोका अधिक असतो. त्यामुळे डासांपासून बचाव करणे आजच्या घडीला अत्यंत आवश्यक आहे. वेळोवेळी घराभोवतीची स्वच्छता राखणे, पाणी साचू न देणे आणि काही घरगुती उपायांचा अवलंब करणे हे डासांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महत्त्वाचे ठरते. जर तुम्हीही डासांच्या त्रासामुळे हैराण असाल, तर हे सोपे उपाय नक्की करून बघा.
कापूर आणि कडुलिंबाच्या तेलाचा दिवा
कापूर आणि कडुलिंबाच्या तेलाचा दिवा हा डासांना पळवून लावण्यासाठी अत्यंत प्रभावी आणि पारंपारिक उपाय मानला जातो. एका छोट्या दिव्यात कडुलिंबाचे तेल टाकून त्यात एक कापूर टाकावा आणि रुईची वात लावून दिवा पेटवावा. कडुलिंबाच्या तेलात आणि कापूरामध्ये असे घटक असतात ज्यांचा वास डासांना अजिबात सहन होत नाही. त्यामुळे दिवा पेटवल्यावर घरातला डासांचा त्रास लगेच कमी होतो. हा उपाय विशेष म्हणजे संध्याकाळच्या वेळेला उपयुक्त ठरतो.
कापूरमिश्रित पाण्याचा स्प्रे
कापूर आणि पाणी यांचे मिश्रण घरभर शिंपडल्यास किंवा फवारल्यास डास लवकर दूर जाते. त्यासाठी अर्धा कप पाण्यात दोन कापूर टाकून चांगले मिसळावे आणि ते मिश्रण स्प्रेच्या बाटलीत भरून घ्यावे. हा स्प्रे घराच्या कोपऱ्यांमध्ये, खिडक्या दरवाजे, पलंग यांच्याजवळ शिंपडावे. त्यामुळे डास घरात राहत नाही. आणि त्याचबरोबर कापराचा हलका सुगंध वातावरणात पसरतो. त्यामुळे घरात स्वच्छ आणि आनंदी वातावरण तयार होते. हा उपाय नियमित केला तर डासांची संख्या कमी होते.
कापूर आणि मोहरीचे तेल
कापूर आणि मोहरीच्या तेलाचे मिश्रणाचा वासही डासांना अजिबात सहन होत नाही.त्यामुळे एका छोट्या वाटीत कापुस घ्या, त्यावर कापूर आणि थोडे मोहरीचे तेल टाकून तो कापुस खोलीच्या कोपऱ्यात ठेवा. या वासामुळे डास खोलीत प्रवेश करीत नाहीत. विशेष म्हणजे रात्री झोपताना हा उपाय केल्यास डास चावण्याचा त्रास टळतो आणि शांत झोप लागते. मोहरीच्या तेलाचा वास डासांना आवडत नाही आणि कापराचा तीव्र सुगंध त्यांना पटकन दूर पळवतो.