डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होणे ही सामान्य गोष्ट वाटू शकते. पण लहान मुलांना आणि वयस्कर व्यक्तींना डिहायड्रेशनची समस्या धोकादायक ठरू शकते. निरोगी शरीरासाठी पाण्याची पातळी योग्य असणे आवश्यक असते. जेव्हा शरीराला हव्या तेवढ्या पाण्याचे सेवन केले जात नाही, तेव्हा डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते, त्यामुळे ते सतत आजारी पडत असतात. त्यात जर लहान मुलांना सतत उल्टी, जुलाब असा त्रास होत असेल तर त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. तर वयस्कर व्यक्तींना पाण्याचे कमी सेवन केल्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. याची लक्षणे कोणती आहेत जाणून घ्या.

लहान मुलांमध्ये दिसणारी डिहायड्रेशनची लक्षणे

  • तोंड आणि जीभ कोरडी होणे
  • रडताना डोळ्यांतून पाणी न येणे
  • ३ तासांपर्यंत लघवी न करणे
  • सतत चिडचिड करणे

वयस्कर व्यक्तींमध्ये दिसणारी डिहायड्रेशनची लक्षणे

  • सतत तहान लागणे
  • लघवी कमी होणे
  • लघवीचा रंग गडद होणे
  • चक्कर येणे
  • थकवा जाणवणे

ही लक्षण आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. एखाद्या व्यक्तीला जुलाब,उल्टी होत असेल, सतत ताप येत असेल, लघवीला जास्त होत असेल, जास्त घाम येत असेल तर अशा व्यक्तींना देखील डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन यावर त्वरित उपचार करावा.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)