How to get rid of rice bugs naturally: बऱ्याचदा काही घरांमध्ये वर्षभरासाठी तांदूळ किंवा अन्य कोणत्याही धान्यांची साठवणूक केली जाते. मात्र, कोणत्याही धान्याचा साठा करून ठेवायचा असेल, तर त्याची विशेष काळजी घेणंही तितकंच गरजेचं असतं. अनेक वेळा वातावरणातील बदल किंवा तांदळाची योग्य काळजी न घेतल्यामुळे ते खराब होतात. त्यांच्यात कीड किंवा अळ्या लागणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत तांदळातून किडे काढण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि वेळही वाया जातो. या समस्या दूर करण्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तांदळाच्या डब्यातील किडे सहज दूर होतील.
या उपायाने तांदळाला कीड वा अळी लागणार नाही
मसाल्याची पिशवी
कीड आणि अळीपासून तांदळाला वाचण्यासाठी तांदळाच्या डब्यात मसाल्याची पिशवी बांधून ठेवा. त्यासाठी एक सुती कापड घेऊन, त्यात दालचिनी,वेलची, हळद, लवंग हे मसाले घाला. त्यामुळे तांदूळ दीर्घकाळ चांगले राहतील. हे मसाले तीव्र सुगंध देतात, जे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल आहेत. हा सुगंध किडे, अळ्या सहन करू शकत नाहीत. .
लाल मिरची किंवा लसूण
तुमच्या तांदळाला किड्यांपासून वाचवण्यासाठी तुम्ही लाल मिरच्या किंवा लसूणदेखील वापरू शकता. त्यासाठी पाच लाल मिरच्या किंवा न सोललेल्या लसणाच्या पाकळ्या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवा. त्यामुळे तांदळाला कीड लागणार नाही.
तमालपत्र
तांदळाच्या डब्यातील किडे नाहीसे करण्यासाठी तुम्ही लाल मिरचीच्या जागी तमालपत्रही वापरू शकता. तांदळाचे कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी तमालपत्र खूप फायदेशीर आहे.
कडुलिंबाची पाने
दीर्घकाळासाठी तांदूळ टिकवण्यासाठी तुम्ही त्यात कडुलिंबाची पाने दखील ठेवू शकता. कडुलिंबामध्ये असे औषधी गुणधर्म आहेत की, जे भातामध्ये कीटक आणि अळ्यांची पैदास होण्यापासून रोखतात. हे करण्यासाठी कडुलिंबाची पाने धुऊन, ती उन्हात वाळवा आणि नंतर तांदळात ठेवा.
उन्हात ठेवा
तांदळात सोनकिडे असतील, तर तांदूळ काही वेळेसाठी उन्हात ठेवा. पण, जर तुम्हाला तांदळाला बरेच दिवस साठवायचे असेल, तर ते जास्त वेळ उन्हात ठेवू नका; अन्यथा तांदूळ तुटण्याची शक्यता असते.