How To Get Rid Of Rats: अनेकदा घराच्या खिडकीतून किंवा दरवाजातून एखादा उंदीर घरात शिरतो. मग हळूहळू त्यांच्याद्वारे घरामध्ये उंदरांचा सुळसुळाट होतो. या उंदरांमुळे कधी कधी खूप मोठे नुकसान होते. घरातील विविध वस्तू, अन्नपदार्थांसोबतच ते घरातील विजेच्या तारा आणि महागडे कपडेही खराब करून खूप नुकसान करतात. त्याशिवाय घरामध्ये घाणही आणतात आणि रोगराई पसरवतात. म्हणून काही सोप्या उपायांनी घरातील उंदरांना कसं पळवून लावायचं हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जर तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल, तर तुम्ही काही घरगुती उपाय वापरून पाहू शकता. ही पद्धत केवळ उंदरांना दूर करण्यासाठीच प्रभावी नाही, तर त्यात वापरलेले सर्व साहित्य घरात सहज आढळते. कोणतेही रसायन वापरले जात नसल्याने ते सुरक्षितदेखील असेल.

साहित्य:

  • मोठी वाटी
  • दीड चमचा गव्हाचे पीठ
  • एक चमचा लाल तिखट
  • एक रुपयाचा शाम्पू पाऊच
  • पाणी आणि जुना रुमाल
  • कापूरच्या गोळ्या

कृती:

  • तुम्ही एक जुनी वाटी घ्या आणि त्यात गव्हाचे पीठ व लाल तिखट पावडर घाला. हवे असल्यास, तुम्ही हिरव्या मिरच्यादेखील वापरू शकता. त्यामध्ये पाणी घालून त्याची मिश्र पेस्ट बनवा.
  • या पेस्टमध्ये शॅम्पू मिक्स करा. त्यानंतर रुमाल पसरवा आणि ब्रशच्या मदतीने त्यावर तयार केलेले मिश्रण लावा. आता या मिश्रणावर कापराची गोळी कुस्करून टाकावी लागेल. कारण- उंदरांना कापराचा वास अजिबात आवडत नाही.
  • आता हे कापड अशा ठिकाणी ठेवा, जिथे तुम्हाला उंदरांच्या जास्त हालचाली दिसतात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कापडाचे छोटे तुकडे करून, घराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात ठेवू शकता. तयार केलेल्या पेस्टमध्ये मिसळलेली लाल तिखट पावडर, कापूर व शाम्पू यांचा तीव्र वास उंदरांना अस्वस्थ करतो आणि त्यांना त्या ठिकाणाहून पळून जाण्यास भाग पाडतो. उंदीर हा एकत्रितपणे येणारा वास सहन करू शकत नाहीत आणि थोड्याच वेळात ते ठिकाण सोडून जातात. त्याशिवाय या उपायाने उंदीर मरत नाहीत. त्यामुळे मेलेले उंदीर स्वच्छ करण्याची समस्या येणार नाही.