Natural Hair Dye: अनेक जण केस तुटणे, पांढरे होणे यांसारख्या समस्येने ग्रस्त आहेत. केस तुटणे किंवा पांढरे होण्यामागे ताणतणाव, जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या अनारोग्यकारक सवयी, जडलेले एक वा अनेक विकार आदी अनेक कारणेही असू शकतात. अनेक लोकांचे केस कमी वयात पांढरे होतात. अशा परिस्थितीत, प्रत्येकाला केस पुन्हा काळे दिसावेत, असे वाटते. केस काळे करण्यासाठी वारंवार हेअर डाय किंवा रसायनमिश्रित रंग लावल्याने केस कोरडे, निर्जीव व कमकुवत होतात. जर तुम्हालाही रसायनांशिवाय नैसर्गिकरीत्या तुमचे केस काळे करायचे असतील, तर ही घरगुती रेसिपी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.
चहा पावडरचे पाणी केसांसाठी फायदेशीर ठरू शकते. चहा पावडरच्या पाण्यात कॅटेचिन नावाचा सक्रिय घटक असतो, जो केसांच्या बाबतीतल्या समस्या दूर करण्यास साह्यभूत ठरतो.
त्यासाठी एका पॅनमध्ये १ लिटर पाणी घ्या. त्यात दोन चमचे चहा पावडरचे पाणी घाला आणि काही वेळ ते उकळवा. काही वेळाने गॅस बंद करा. थंड झाल्यानंतर हे पाणी केसांसाठी वापरा. त्यानंतर ३०-४० मिनिटांनी केस बांधून ठेवा. तुम्ही चहा पावडरच्या पाण्यात कोरफडीचे जेल मिसळून, ते कंडिशनर म्हणूनही वापरू शकता. असे हे कंडिशनर काही वेळ लावून ठेवा आणि नंतर ते धुवा.
चहा पावडरच्या पाण्याचे फायदे
केसांची झपाट्याने वाढ
केसांसाठी चहा पावडरचे पाणी वापरल्याने केसांची वाढ चांगल्या रीतीने होते. त्यामुळे केस गळणेही थांबते. टाळूवर चहाच्या पानांचे पाणी फवारल्याने रक्ताभिसरण व्यवस्थित होते. त्यामुळे केसांची वाढ जलद होते. त्यासाठी केस ओले करा आणि चहा पावडरच्या पाण्याची फवारणी करा.
पांढऱ्या केसांची समस्या दूर होते
आजकाल बरेच लोक पांढऱ्या केसांच्या समस्येने त्रस्त आहेत. अशा लोकांसाठी चहा पावडरचे पाणी फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे केस काळे होण्यास मदत होईल. चहापावडरचे पाणी केसांमधील कोलेजन वाढवते आणि केस पुन्हा काळे होण्यास मदत करते. तुम्ही दररोज चहापावडरच्या पाण्याने तुमचे केस धुऊ शकता.
केस होतील चमकदार
जर तुम्हालाही तुमचे केस चमकदार बनवायचे असतील, तर चहा पावडरचे पाणी वापरा. त्यामुळे केसांना चमक येते आणि त्यांचा पोतही सुधारतो. तुम्ही ते केसांसाठी कंडिशनर म्हणूनदेखील वापरू शकता. परंतु, यासाठी चहापावडरच्या पाण्यात कोरफड मिसळून ते वापरा. त्यामुळे केस रुक्ष होणार नाहीत.