सकस आहाराची कमतरता आणि धावपळीची जीवनशैली यामुळे सध्या अनेक आजारांना आमंत्रण देणारी ठरत आहे. यामध्ये थायरॉईड या आजाराचा समावेश असून हा आजार महिलांमध्ये मोठय़ा प्रमाणात दिसून येत आहे. एक हजरापैकी ८० रुग्ण महिला या आजाराने ग्रस्त आहे. साधारणत: वयाच्या तिशीनंतर महिलांमध्ये आढळून येणारा हा आजार सध्या वयाच्या १० ते १४ पासूनच आढळून येत असल्याची धक्कादायक बाब समोर येत असल्याने वैद्यकीय क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे.
थॉयरॉईड ही मानवी शरीरातील एक महत्त्वपूर्ण ग्रंथी आहे. या ग्रंथीचे स्थान गळ्यात विशिष्ट ठिकाणी असते. शरीर किती वेगाने ऊर्जा खर्च करते, शरीरात किती प्रोटिन तयार होतात आणि अन्य हार्मोन्सच्या बाबतीत शरीर किती संवेदनशील आहे, या बाबींवर या ग्रंथीचे नियंत्रण असते. या सगळ्या प्रक्रियेदरम्यान ट्रायओडोथायरॉनाईन (टी-३) आणि थायरॉक्सिन (टी-४) हे दोन प्रकारचे हार्मोन्स तयार होतात. हे हार्मोन्स विशिष्ट शारीरिक प्रक्रियेसाठी आवश्यक असतात. थायरॉईडचे सुप्त थॉयरॉईड (हायपो थायरॉइडीझम) किंवा जागृत थायरॉईड (हायपर थायरॉडिझम) असे दोन प्रकार असून, ते व्यक्तीला आयुष्यात कोणत्याही वयात होऊ शकतात, अशी माहिती मेडिकलचे अधीक्षक डॉ. अपूर्व पावडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
थकवा येणे, महिलांना वारंवार जादा मासिक स्त्राव होणे, विसरभोळेपणा, वजन वाढणे, कोरडी-खरखरीत त्वचा आणि पातळ केस, घोगरा आवाज, थंडी सहन न होणे, ही हायपो थायरॉईडीझमची लक्षणे आहेत. समुद्राकाठची खारी हवा आणि वातावरणामुळे रत्नागिरी, अलिबाग या ठिकाणच्या नागरिकांमध्ये थायरॉईडच्या तक्रारींचे प्रमाण झपाटय़ाने वाढत आहे. अन्नातील आयोडीनची कमतरता आणि आहारातील पोषणमूल्यांच्या ढासळत्या प्रमाणामुळे नंदुरबार, मेळघाट व गडचिरोली येथील आदिवासींमध्येही थायरॉईडचे आजार मोठय़ा प्रमाणात दिसू लागले आहेत.
वेळीच उपचार केले नाही तर हायपो थायरॉईडीझम आणि हायपर थायरॉईडीझम या दोन्हीमुळे शरीरात गंभीर स्वरूपाची गुंतागुंत निर्माण होऊ शकते. महिलेच्या गरोदरपणाच्या काळात हार्मोन्सच्या अनियंत्रित वाढीमुळे रक्तसंचयाने होणारा हृदयरोग, अॅनिमिया, गर्भपात, बाळाचे वजन कमी असणे, मृत बालक जन्माला येणे अशा गंभीर बाबी घडू शकतात. त्यातही गरोदर स्त्रीला आयोडीनची कमतरता भासल्यास मतिमंद किंवा जन्मजात गंभीर, बरी न होणारी विकृती अपत्यामध्ये वाढू शकते. स्थूलपणा, नैराश्य, वंधत्व, मासिक पाळी बंद होण्याच्या वेळेची लक्षणे, उच्च कोलेस्टेरॉल या समस्या थायरॉईड ग्रंथीच्या विकारामुळे उद्भवू शकतात, अशी माहितीही डॉ. पावडे यांनी दिली. आयोडीन हे खनिज थायरॉईड ग्रंथीसाठी उपकारक समजले जाते. थायरॉईड ग्रंथीचे कार्य, वाढ तसेच मेंदू आणि शरीर यांचा एकूण विकास करण्यासाठी या खनिजाचा वापर होतो. आयोडीनच्या कमतरतेमुळे थायरॉईडचा आजार उद्भवतो. आयोडिनची कमतरता असल्याचे दिसून येताच आयोडीन मीठ घ्यावे.
आयोडीन या घटकाचे अपुरे सेवन व त्यामुळे उद्भवणारे आजार लवकर बरे होत नाहीत. त्यामुळे आयोडीनचे अन्नातील प्रमाण योग्य राहील. यासाठी जागरुक राहायला हवे. आयोडीन शरीरात साठवले जात नाही. त्यासाठी आयोडीनचे रोजच सेवन केले पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे, थायरॉईड १०० टक्के बरा होत नाही. तर त्याला फक्त १०० टक्के नियंत्रणात ठेवता येते. कोणत्याही परिस्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय थायरॉईडची औषधे बंद करू नये. दर २ ते ३
महिन्यांनी थायरॉईड हार्मोन्सची तपासणी करणे आवश्यक असते. त्याच्या अहवालानुसार औषधाची मात्र निश्चित केली जाते, असेही डॉ. पावडे यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 26th Apr 2014 रोजी प्रकाशित
महिलांमध्ये थायरॉईडचे वाढते प्रमाण
सकस आहाराची कमतरता आणि धावपळीची जीवनशैली यामुळे सध्या अनेक आजारांना आमंत्रण देणारी ठरत आहे. यामध्ये थायरॉईड या आजाराचा समावेश असून हा आजार महिलांमध्ये मोठय़ा प्रमाणात दिसून येत आहे.
First published on: 26-04-2014 at 03:09 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thyroid ratio increases in women