गुजरातच्या कच्छच्या रणात पारंपरिक भुंगा घरे प्रसिद्ध आहेत, या घरांचे वैशिष्टय़ असे की, ती गुजरातमध्ये भूकंप होऊनही पडली नाहीत, त्यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचले. त्यावेळी म्हणजे २००१ च्या प्रजासत्ताकदिनाची सकाळ ही अनेकांच्या आयुष्याची सायंकाळ ठरली. याच दिवशी कच्छच्या रणातील बछाऊ तालुक्याला हादरा देणारा ७.७ रिश्टरचा भूकंपाचा धक्का बसला होता व भूज जिल्ह्य़ातील अनेक घरे भुईसपाट झाली, परंतु भुंगा नावाच्या या गोलाकार झोपडीवजा घरात झोपलेले लोक मात्र वाचले होते. आज ही घरे म्हणजे पर्यटकांची आकर्षण केंद्रे ठरली आहेत. गुजरातमध्ये रणोत्सवात अनेक लोक ही घरे पाहण्यासाठी आले होते. सीमेलगत असलेल्या कच्छच्या रणात पांढऱ्या मिठाची वाळवंटे आहेत. तेथील धोडरे हे खेडे असेच आंतरराष्ट्रीय आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. भुंगा प्रकारच्या या घरांनी तेव्हा अनेकांचे प्राण वाचवले. आता भारत व परदेशातील लोक या घरांच्या रचनेचा अभ्यास करीत आहेत असे धोडरे खेडय़ाचे सरपंच मियाँ हुसेन यांनी सांगितले.भूज हे शहरी भागातील गाव या भूकंपाने उद्ध्वस्त केले पण या खेडय़ातील घरे भूकंपात टिकून राहिली. त्यानंतर काही वर्षांनी आम्ही येथे श्वेत वाळवंट उत्सव सुरू केला व पर्यटकही गर्दी करू लागले. ते या घरांमध्ये वास्तव्याचा अनुभव घेऊ लागले. ही पारंपरिक घरे चिखल मातीची असतात पण आरशाच्या काचांनी सजवली जातात. घरातील वस्तूच त्यांच्या सजावटीसाठी वापरतात. दंडाकार असलेली ही घरे असली तरी त्यांचे छप्पर म्हणजे कोनासारखे असते पण ते लाकडाचे असते. त्यासाठी खास लाकूड वापरतात ते काही कारागीर कोरून सजावट करतात. तेथील मुली विवाह करून नवीन घरी जातात तेव्हा त्यांना ज्या कलावस्तू भेट म्हणून देतात त्या या लाकडाच्याच असतात. विशेष म्हणजे धोडरे गावचे प्रमुख हुसेन यांचे घर हे आता संग्रहालयच बनले आहे.भौमितिकदृष्टीने या घरांचा विचार केला तर ते भूकंपाचा धक्का सहन करू शकतात हे सिद्ध झाले आहे. भुंगा घरांपासून प्रेरणा घेऊन आता भूज व इतर भागात अनेकांनी तशीच घरे बांधली आहेत. त्याला थोडा शहरी बाज दिला आहे एवढाच फरक त्यात आहे. भूजमधील आइना महल व प्राग महल ही आकर्षण केंद्रे त्या भूकंपात बरीचशी नष्ट झाली किंवा त्यांना हानी पोहोचली. १८७९ मध्ये बांधलेल्या प्राग महालाचे नूतनीकरण करण्याची सूचना गुजरातचे ब्रँड अॅम्बेसेडर अमिताभ बच्चन यांनी २०१० मध्ये केली होती. आता तर गुजरात सरकारने भुंगा सूट (खोल्या) असलेले खास रिसॉर्ट्स तयार केले आहेत. दोन अमेरिकी महिलांनी या भुंगा घरांवर संशोधन केले असून त्या या घरांमध्ये अतिथी म्हणून राहिल्या होत्या. अनेक आंतरराष्ट्रीय नियतकालिकात या घरांची व त्यावर आधारित पर्यटन महोत्सवाची कथा सचित्र प्रसिद्ध झालेली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Mar 2014 रोजी प्रकाशित
मजबुत घरांचा ‘भुंगा’भ्यास!
गुजरातच्या कच्छच्या रणात पारंपरिक भुंगा घरे प्रसिद्ध आहेत, या घरांचे वैशिष्टय़ असे की, ती गुजरातमध्ये भूकंप होऊनही पडली नाहीत, त्यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचले.

First published on: 01-03-2014 at 12:09 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traditional circular house form bhunga in kutch gujarat