न्यू इयरनिमित्त तुमच्यापैकी अनेकजण सुंदर, निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचा प्लॅन बनवत असतील. यासाठी काहींनी उत्तर भारतात तर काहींनी दक्षिण भारतातील ठिकाणं, तर काहींनी इतर नवीन जागा एक्सप्लोर करण्याचा प्लॅन आखला असेल. यात काहींनी प्लॅन बनवून विमानाचे तिकीटही बुक केले असेल, पण तुम्ही पहिल्यांदा विमान प्रवास करत असाल तर काही गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. या गोष्टींपैकीच एक म्हणजे विमानातून प्रवास करताना आपल्याबरोबर काही गोष्टी नेण्यास मनाई आहे. या वस्तू तुम्ही विमानात घेऊन जाऊ शकत नाही.

अशा स्थितीत जर तुम्ही या वस्तू विमानात नेत असताना पकडले गेलात आणि त्या नेण्यासाठी तुम्ही जबरदस्ती केली तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. अशावेळी रडण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा पर्याय उरत नाही. पण, विमानात घेऊन जाऊ शकत नाहीत अशा कोणत्या वस्तू आहेत? चला जाणून घेऊ…

तीक्ष्ण धारदार वस्तू

विमान प्रवास करताना तुम्ही तुमच्या कॅरी बॅगमध्ये कोणतीही तीक्ष्ण धार असलेल्या वस्तू ठेवू नका. या गोष्टींमध्ये ब्लेड, कटर, नेल कटर, फाइलर किंवा कोणतीही तीक्ष्ण वस्तू यांचा समावेश होतो. चेकिंगच्यावेळी या सर्व वस्तू काढून विमानतळ प्राधिकरणाकडे जमा केल्या जातात. त्यामुळे तुमचा वेळ वाया जातो आणि काहीवेळा विमानतळावरील कर्मचाऱ्यांशी वाद होऊ शकतो.

द्रव पदार्थ किंवा मद्य

विमान प्रवासादरम्यान लहान मुलांसाठी तुम्ही १०० मिमीपर्यंत दूध किंवा इतर द्रव पदार्थ आरामात घेऊन जाऊ शकता. परंतु, जर तुम्ही एका शहरातून दुसऱ्या शहरात दारू किंवा इतर द्रवपदार्थ घेऊन जात असाल, तर ते चेकिंगदरम्यान केबिन बॅगेजमध्ये नेले जाऊ शकत नाही.चेक-इन बॅगमध्ये या सर्व वस्तू मर्यादित प्रमाणात नेण्यास परवानगी आहे. तसेच औषधांबरोबर तुम्ही कोणत्याही प्रकारचे द्रव पदार्थ नेण्यासंदर्भात काही वेगळे नियम आहेत.

दोन लॅपटॉप

जर तुम्ही सुट्टीनिमित्त बाहेर असताना लॅपटॉप घेऊन जाण्याचा विचार करत असाल, तर कदाचित ते तुम्हाला महागात पडेल. कारण तुम्हाला फ्लाइटमध्ये एक लॅपटॉप घेण्याची परवानगी आहे, परंतु तुम्ही दोन लॅपटॉप घेतल्यास, ते अजिबात शक्य नाही. प्रत्येक विमान कंपनीचे स्वतःचे नियम असले तरी प्रवास करण्यापूर्वी एकदा मार्गदर्शक तत्त्वे तपासा.

स्फोटक वस्तू

फ्लाइटमध्ये प्रवास करताना गॅसने भरलेली कोणतीही वस्तू, जसे की लाइटर, माचिस किंवा कोणतीही स्फोटक वस्तू सोबत नेऊ नका. हे सर्व चेकिंगदरम्यान तुमच्या सामानातून काढून टाकले जाईल आणि जर काही गंभीर सामान आढळले तर तुम्हाला पुढील समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

मांसाहारी पदार्थ, भाजी

विमान प्रवास करताना तुम्हाला मांसाहारी पदार्थ किंवा तयार भाजी यांसारख्या गोष्टी बरोबर घेऊन जाण्यास परवानगी नाही. कारण विमानतळावरच या वस्तू जप्त केल्या जाऊ शकतात. कोणत्याही एअरलाइनमध्ये तिकीट बुक करताना तिथली मार्गदर्शक तत्त्वे नक्कीच वाचा.