“तर तुमचं  नाव सांगा”, “तुमचं ग्रॅज्युएशन झालंय का?” वगैरे प्रश्नांचा जमाना गेला. आता हट के विचार करणाऱ्यांचा जमाना आहे. त्यामुळे जाॅब इंटरव्ह्यूसाठीसुध्दा असे प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न साधेसुधे नसतात तर ते उमेदवारांना खरोखर विचारात पाडणारे असतात. त्यांची क्रिएटिव्हिटी पणाला लावणारे असतात. या प्रश्नांना कोणतंही बरोबर किंवा चूक असं उत्तर नसतं. या प्रश्नांची उत्तरं द्यायला या उमेदवारांना त्यांच्या कल्पनाशक्तीतला ताण देत उत्तरं द्यावी लागतात. या उत्तरांमधून त्यांच्या तांत्रिक ज्ञानासोबतच त्यांची क्रिएटिव्हिटी पाहिली जाते. किंबहुना हे पाहण्यासाठीच हे प्रश्न ‘डिझाईन’ केलेलं असतात. गूगल, मायक्रोसाॅफ्ट, अॅपल यांसारख्या जगभरात आघाडीवर असणाऱ्या कंपन्यांच्या मुलाखतींमध्ये तर हे प्रश्न हमखास विचारले जातात. अॅपल च्या इंटरव्ह्यूमध्ये याआधी विचारले गेलेले असे काही प्रश्न:

१. बिल्डिंगच्या कुठल्या मजल्यावरून अंडं फेकलं तर ते फुटण्याची शक्यता सगळ्यात कमी असते? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कसं शोधून काढाल? तुमच्याकडे फक्त दोनच अंडी आहेत.

२. तुम्हाला पडलेला एखादा इंटरेस्टिंग प्रश्न कोणता? आणि त्या इंटरेस्टिंग प्रश्नाची उकल तुम्ही कशी केलीत?

3. मोडेम किंवा राऊटर म्हणजे काय हे एखाद्या आठ वर्षांच्या मुलाला तुम्ही कसं समजवाल?

४. एका टेबलावर १०० नाणी ठेवलेली आहेत. त्यातली १० नाण्यांचा छापा वरच्या बाजूला आहे तर ९० नाण्यांचा काटा वरच्या बाजूला आहे. तुम्हाला माहीत नाही की कोणती नाण्याची कोणती बाजू वरच्या बाजूला आहे. अशा वेळी प्रत्येक गटामध्ये छापा वर असणाऱ्या नाण्यांची संख्या समान असेल अशा पध्दतीत या नाण्यांची विभागणी करा (हुश्श!)

५. माझ्या हातातल्या या पेनची किंमत काय असेल आणि ती तेवढी का?

६. तुम्ही स्मार्ट आहात का?

७. तुमच्या आयुष्यातल्या एका मोठ्या अपयशाविषयी सांगा. त्यातून तुम्ही काय शिकलात?

वाचा – नोटाबंदीचा अॅपलला फटका, आयफोनच्या विक्रीत घट

यातले काही प्रश्न सोपे वाटत असले तरी त्याची उत्तरं तुम्ही काय देता त्यावरून मुलाखत घेणारा तुम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे ठोकळेबाज पध्दतीने विचार करणं सोडा, विचार मुक्त करा, स्वत:ला प्रश्न पाडून घ्या आणि त्यांची उत्तरंही आसपासच्या जीवनातून शोधण्याचा प्रयत्न करा