Tulsi Drying Tips: तुळशीचं रोप केवळ औषधी गुणांनी भरलेलं नसतं, तर त्याला धार्मिक महत्त्वही खूप असतं. प्रत्येकाला आपल्या घरी असलेलं तुळशीचं रोप हिरवंगार आणि निरोगी ठेवायचं असतं. पण, पावसाळ्यात त्याची काळजी घेणं थोडं अवघड होतं. पावसामुळे जास्त ओलावा, पाणी साठणं आणि बुरशी यांसारख्या समस्या त्याची वाढ थांबवू शकतात. अशा वेळी काही गोष्टींची काळजी घेतली, तर तुळशीचं रोप संपूर्ण हंगामभर हिरवंगार राहू शकतं.
तुळशीसाठी माती (Tulsi Soil)
तुळस हिरवीगार ठेवण्यासाठी पाणी निघून जाणारी चांगली माती वापरा. पावसाळ्यात पाणी साठून राहणं ही सगळ्यात मोठी समस्या असते. त्यामुळे पाणी निघून जाणारी चांगली माती वापरणे खूप गरजेचे ठरते. मातीमध्ये वाळू, कोकोपीट किंवा गांडूळ खत (वर्मी कंपोस्ट) मिसळू शकता, ज्यामुळे पाणी सहज निघून जाईल आणि मुळं कुजणार नाहीत.
तुळशीचं रोप अशा ठिकाणी ठेवा जिथे थेट पावसाचं पाणी खूप जास्त प्रमाणात येऊ नये. जर ते कुंडीत असेल, तर ते बाल्कनीत किंवा छताच्या अशा भागात ठेवा जिथे पावसाच्या जास्त होणाऱ्या पाण्यापासून थोडं संरक्षण मिळेल. थेट जोरदार पावसानं रोपाची पानं खराब होऊ शकतात.
पावसाळा असला तरी माती सुकल्यावरच पाणी देण्याचा प्रयत्न करा. जास्त पाणी दिल्यानं रोपाची मुळं कुजू शकतात. मातीचा ओलावा तपासण्यासाठी आपलं बोट एक इंचापर्यंत मातीत घाला. जर ती कोरडी वाटली, तरच पाणी द्या.
तुळशीसाठी खत (Tulsi Khat)
पावसाळ्यात रोपाला पोषक घटकांची गरज असते. दर १५-२० दिवसांनी द्रवरूप सेंद्रिय खत, गांडूळ खत किंवा शेणखताचा पाण्यात मिसळून वापर करू शकता. मात्र, रासायनिक खतांचा वापर टाळा. कारण- त्यामुळे रोपाचं नुकसान होऊ शकतं.
रोपाची वाढ चांगली होण्यासाठी वेळोवेळी त्याची छाटणी करा. सुकलेली किंवा पिवळी पानं काढून टाका. तुळशीवर येणारी मंजिरीही तोडा. कारण- त्यामुळे रोपाची सगळी ताकद फुलं आणि बियांच्या निर्मितीमध्ये जाते आणि पानांची वाढ थांबते.
पावसाळ्यात तुळशीची कशी घ्याल काळजी? (How to take care of Tulsi in Rainy Season)
पावसाळ्यात ओलाव्यामुळे बुरशी लागण्याचाही धोका वाढतो. त्यामुळे अशा परिस्थितीत पाण्यात कडुलिंबाचं तेल मिसळून, त्याची फवारणी केल्यास बुरशी आणि इतर किडींपासून तुळशीचं संरक्षण होतं. हा एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहे, जो खूप स्वस्तही आहे.
तुळशीच्या रोपाच्या चांगल्या वाढीसाठी हवेशीर जागा असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही रोप अशा ठिकाणी ठेवा, जिथे रोपाला चांगली हवा मिळू शकेल. मग रोपाला चांगली हवा मिळाल्यास पानांवर ओलावा राहणार नाही आणि बुरशी लागण्याचा धोका कमी होईल. रोप खूप दाट झालं असेल, तर थोडी छाटणी करून ते मोकळं ठेवा. असं केल्यानं रोपाला नवीन पानं येतील.