TVS ने भारतीय बाजारातून आपली Wego स्कूटर बंद केली असून कंपनीने ही स्कूटर आपल्या वेबसाइटवरुनही हटवली आहे. कंपनी 110cc क्षमतेची ही स्कूटर बीएस-6 इंजिनमध्ये अपडेट करणार नाहीये. कंपनी बीएस-4 मॉडेलमध्ये या स्कूटरचं प्रोडक्शन सुरू ठेवणार आहे. पण तेही केवळ निर्यातीसाठीच असणार आहे. म्हणजे ही स्कूटर आता भारतामध्ये उपलब्ध नसेल. Wego बंद झाल्यामुळे आता मार्केटमध्ये 110सीसी क्षमतेच्या केवळ चारच स्कूटर उपलब्ध आहेत.
TVS Wego ही स्कूटर कंपनीने जवळपास 10 वर्षांपूर्वी 2010 मध्ये लाँच केली होती. लाँचिंगनंतर काही वर्ष या स्कूटरला भारतीय बाजारात ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पण, गेल्या काही काळापासून या स्कूटरच्या विक्रीचा वेग मंदावला. याच कारणामुळे कंपनीने ही स्कूटर बंद केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीएस-6 इंजिनमध्ये Wego अपडेट करण्याऐवजी कंपनी BS6 Scooty Zest लाँच करेल अशी चर्चा आहे. सध्या जूपिटर आणि एनटॉर्क, या टीव्हीएसच्या सर्वाधिक लोकप्रिय स्कूटर आहेत. कंपनीने या दोन्ही स्कूटर बीएस-6 इंजिनमध्ये अपडेटही केल्या आहेत.
TVS Wego बंद झाल्यामुळे आता मार्केटमध्ये 110सीसी क्षमतेच्या स्कूटर्सची संख्या अजून कमी झाली आहे. Yamaha ने काही दिवसांपूर्वीच केवळ 125सीसी क्षमतेच्या स्कूटर बनवण्याचं जाहीर केलंय. अन्य कंपन्याही आता 125सीसी स्कूटर सेगमेंटवर अधिक भर देत आहेत. मार्केटमध्ये सध्या होंडा अॅक्टिवा 6जी, होंडा डियो, टीव्हीएस जूपिटर आणि हीरो प्लेजर या चारच 110सीसी क्षमतेच्या स्कूटर उपलब्ध आहेत.
टीव्हीएस गेल्या काही महिन्यांपासून आपल्या वेबसाइटवर बीएस-6 मॉडेल्स अपडेट करत आहे. कंपनीच्या बहुतांश दुचाकी बीएस-6 इंजिनमध्ये अपडेटही झाल्या आहेत. मात्र, करोना व्हायरसच्या प्रादूर्भावामुळे उर्वरित अन्य टू-व्हिलर्सना अपडेट करण्यासाठी अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे.