Kitchen Jugaad: पावसाळ्याचा महिना म्हणजे खवय्यांची चंगळ. पण मेजवान्या तयार करताना आणि त्याहीपेक्षा वेगवेगळ्या रेसिपी बनवून झाल्यावर भांड्यांचा ढिगारा स्वच्छ करताना जीवाची कशी दमछाक होते ते त्या माणसालाच माहीत. अगदी अस्सल सुगरणी किंवा एखादा नावाजलेला शेफ जरी असला तरी कधी ना कधी आपलं दुर्लक्ष होतंच आणि मग कुकर, कढई, तवा ही भांडी सहज करपतात. जितका वेळ या भांड्यांना करपण्यासाठी लागत नाही त्याहून तिप्पट वेळ त्यांना स्वच्छ करण्यात लागतो. पण आज आपण अशा काही स्मार्ट किचन टिप्स पाहणार आहोत ज्यामुळे तुम्ही अवघ्या पाच मिनिटांमध्ये दोन ते तीन रुपयांचा खर्च करून तुमची सगळी लोखंडी किंवा जर्मनची भांडी स्वच्छ करू शकणार आहात. चला तर मग…
करपलेला कुकर, कढई, तवा स्वच्छ करण्यासाठी टिप्स
१) बटाटा- एखादा सुकलेला किंवा कोंब येऊन खराब झालेला बटाटा जो तुम्ही फेकून देता त्याचा रस या करपलेल्या भागावर लावून घ्या. पाच मिनिटांनी तुम्हाला करपलेला थर मऊसर झाल्यासारखे दिसेल त्यावेळी तुम्ही सहज स्क्रबने घासून भांडी स्वच्छ करू शकता.
२) गरम पाणी: गरम पाणी हे करपलेली भांडी स्वच्छ करण्याचं मॅजिक सोल्युशन आहे. म्हणजे तुम्ही गरम पाण्यात भांडी घासायचा साबण/ लिक्विड, डिटर्जंट पावडर किंवा व्हिनेगर काहीही टाकून पाच मिनिटं भांडी तशीच ठेवल्यास त्यानंतर अगदी हलक्या हाताने भांडी घासून स्वच्छ करता येतील.
३) बेकिंग सोडा: करपलेलं भांडं काहीवेळा आपण अगदी जीवाचा आटापिटा करून स्वच्छ करता, ते लक्ख होतं सुद्धा पण त्यातून येणारा दर्प काही जात नाही. डिटर्जंट किंवा अन्य सुगंधी वस्तू वापरून दर्प बदलत असला तरी त्यातून जंतू नष्ट झाले आहेत का प्रश्न असतोच. अशावेळी बेकिंग सोडा व गरम पाण्याचं मिश्रण वरील दोन्ही समस्यां दूर करू शकतं. शिवाय भांड्यांना चमक येते.
४) गावाकडे असे करपलेले थर स्वच्छ करण्यासाठी साधारण स्क्रब ऐवजी नारळाची किशी वापरली जाते. आपणही हा प्रयोग करून पाहू शकता
५) कुकर, तवा किंवा कढीवरील डाग काढण्यासाठी कोकमाचा सुद्धा वापर करू शकता. एक ते दोन कोकमं हाताने कुस्करून या थरावर चोळायची आणि मग पाण्यात स्क्रब बुडवून भांडी घासून घ्यावी.
हे ही वाचा<< पावसामुळे उश्या- गादीला येतोय कुजल्यासारखा वास? १० रुपयात करा हे पाच उपाय, घर होईल फ्रेश
तुम्हीही हे उपाय करून पाहा आणि त्याचा कसा फायदा होतोय हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.