Vastu Tips to Control Anger : राग येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण, एखाद्या व्यक्तीला गरजेपेक्षा जास्त किंवा अगदी छोट्या छोट्या गोष्टींबाबतही राग येतो तेव्हा त्याचा परिणाम व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावरच नाही, तर त्याच्या आरोग्यावरही होत असतो. राग हा कोणाच्याही प्रगतीमधील सर्वांत मोठा अडथळा मानला जातो. कारण- राग आल्यावर व्यक्ती एकाग्रता गमावून बसते. त्यामुळे ती व्यक्ती आयुष्यात चांगल्या प्रकारे यश मिळवू शकत नाही. त्यामुळे आज तुम्हाला काही वास्तूसंबंधीचे उपाय सांगणार आहोत; ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवू शकता.

रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी फॉलो करा ‘या’ वास्तू टिप्स

१) ‘या’ दिशेने झोपू नका

वास्तुशास्त्रानुसार आग्नेय दिशेला (अग्निकोन) बसल्याने किंवा झोपल्याने राग वाढतो. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला खूप राग येत असेल, तर प्रथम त्या व्यक्तीची बसण्याची किंवा झोपण्याची जागा अग्निकोनात तर नाही ना याची खात्री करावी. कारण- कार्यालयात अग्निकोनात बसणाऱ्या कर्मचाऱ्यांचा स्वभाव आक्रमक होऊ लागतो.

२) झोपताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

झोपताना आपले डोके नेहमी पूर्व किंवा दक्षिण दिशेकडे असले पाहिजे. उशाजवळ प्लेटमध्ये क्रिस्टल बॉल किंवा तुरटीचा तुकडा ठेवून झोपल्याने या समस्येपासून बऱ्याच अंशी आराम मिळतो. त्याशिवाय पूर्व दिशेला जड सामान कधीही ठेवू नका.

हेही वाचा – Chanakya Niti : लग्नासाठी मुलगी बघताय? मग आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या ‘या’ ३ गोष्टी लक्षात ठेवा

३) ‘या’ रंगाचा वापर कमी करा

वास्तुशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीला खूप राग येत असेल, तर त्याने लाल रंगाचा कमीत कमी वापर करावा. भिंती, बेडशीट, पडदे व उशीच्या कव्हरचा रंग लाल नसेल याची काळजी घ्या. कारण- या रंगामुळे राग वाढतो.

४) रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘या’ गोष्टी करा

वास्तुशास्त्रात असेही मानले जाते की, एखाद्या ठिकाणी घाण, अस्वच्छता असेल, तर आपली चिडचिड होते, खूप राग येतो. अशा परिस्थितीत घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ ठेवला पाहिजे. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. तसेच वास्तूनुसार रोज सकाळी आणि संध्याकाळी घराच्या पूर्व दिशेला दिवा लावून तुम्ही रागावर नियंत्रण ठेवू शकाल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)