Home Made Sarbat Powder Will Last For a Year: उन्हाळ्याच्या दिवसात वाढती गरमी आणि आपली सहनशक्ती यांची जणू काही रस्सीखेच स्पर्धाच लागलेली असते. अशावेळी थंडगार पाणी, सरबताचा ग्लास आपल्याला छुपा मदतीचा हात देऊन उष्णतेला हरवण्यास मदत करू शकतो. ताजी फळं आणून त्याचा ज्यूस बनवणं हे प्रत्येक वेळी शक्य होईलच असं नाही, हे तुमच्या इतकंच आम्हीही मान्य करतो. राहिला पर्याय बाहेरून ग्लुकोजची पावडर किंवा प्रक्रिया केलेल्या फळांच्या सरबताच्या पावडर आणणं, पण त्यात काय मिसळलं असेल, ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहेच हे कशावरून असे प्रश्न मनात येणं साहजिक आहे.
दोन्ही मार्ग बंद असताना आज आपण एक वेगळाच भन्नाट असा तिसरा पर्याय पाहणार आहोत, तो म्हणजे स्वतः घरच्या घरी वर्षभर टिकतील अशा फळांच्या सरबताच्या पावडर तयार करणे. एकदा ज्यूस बनवायला लागतो तितकाच वेळ तुम्हाला ही रेसिपी बनवायला सुद्धा लागेल पण त्यातून तुम्ही वर्षभर कधीही हवं तेव्हा सरबत बनवून पिऊ किंवा पाजू शकणार आहात. नेमकी ही पद्धत काय, चला पाहूया..
@Pallavis_Marathi_Kitchen या अकाउंटवर शेअर केलेल्या एका रीलमध्ये वर्षभर टिकणाऱ्या सरबताच्या पावडर कशा बनवायच्या हे सांगितले आहे. तुम्हाला यासाठी हवी ती फळे तुम्ही घेऊ शकता. व्हिडीओमध्ये या क्रिएटरने आपल्याला कलिंगड, संत्री, अननसाची सरबत पावडर बनवायला शिकवले आहे.
आपल्याला हव्या त्या फळाच्या आधी छान बारीक फोडी करून घ्या. बिया वगैरे काढून टाका, गर स्वच्छ असावा जेणेकरून त्याची छान प्युरी तयार होईल.
गाळणीने हा रस गाळून मग आपल्याला चवीनुसार लिंबाचा रस घालायचा आहे, नीट मिसळून घेतल्यावर यात १ मध्यम आकाराच्या वाटीएवढी साखर घालून घ्या.
साखरेच्या दाण्यांमुळे या फळांच्या रसाचा पोत स्क्रबसारखा होईल. मग एखाद्या ताटात नीट हा दाणेदार रस पसरवून घ्या.
एक एक करुन सगळ्या फळांना तुम्ही याच प्रकारे दाणेदार रसात बदलून ताटं तयार करा. मग साधारण तीन ते चार दिवस ही वाळवणाची ताटं घरातच पंख्याखाली सुकवून घ्या. थेट सूर्यप्रकाशात वाळवू नका.
चार दिवसांनी हा रस सांडग्यासारखा कडक झाल्याचं तुमच्या लक्षात येईल. मग मिक्सरला वाटून याची छान बारीक पावडर तयार करून घ्या.
पावडर जास्त दिवस टिकावी यासाठी आपण कोरड्या भांड्यात भरून ठेवताना एक चमचा मीठ घालून मिसळून घ्या.
हे ही वाचा<< साखर हे पांढरं विष? दूध, मध, साध्या साखरेत नेमकं असतं काय? १० दिवस साखर खाल्ली नाही तर कसं बदलेल शरीर?
या पद्धतीने तुम्ही हवं तेव्हा थंडगार पाण्याच्या ग्लासात फक्त ही घरगुती पद्धतीने तयार केलेली पावडर मिसळून चविष्ट सरबत तयात करू शकाल. लक्षात ठेवा ही पावडर हवाबंद डब्यातच ठेवा. आणि हो त्यात ओला चमचा घालू नका, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटतेय कमेंट करून सांगा.