Alu Vadi Leaves In Kudi Video: साध्या जेवणाला पण मेजवानीचा साज द्यायचा असेल तर ताटात एखादी पटकन होणारी, वडी- भजी किंवा तळलेला पदार्थ ठेवला जातो. कोथिंबीर वडी, अळूवडी या पदार्थांची नावं तर नुसती ऐकली तरी तोंडाला पाणी सुटतं, हो की नाही? या दोन्ही प्रसिद्ध वड्यांच्याबाबत एकच चिंता असते ती म्हणजे ही पाने नेमकी कशी व कुठे उगवली असतील. यापूर्वी अनेकदा सोशल मीडियावर गटारांच्या बाजूला केलेली कोथिंबीर, अळूच्या पानांची लागवड व्हायरल झाली आहे. अहो एवढंच कशाला रेल्वेतून ही पाने घेऊन प्रवास केल्यावर स्टेशनला उतरून तिथल्याच सांडपाण्याने पाने धुण्याचे, सुकलेल्या, खराब झालेल्या भाजीच्या ढिगाऱ्यातून पुन्हा निवडून पाने उचलण्याचे सुद्धा अनेक व्हिडीओ यापूर्वी व्हायरल झाले आहेत. नेहमीपेक्षा काहीसे स्वस्त म्हणून काही जण अशी पाने विकत घेतात सुद्धा पण पुढे पोट बिघडण्याचे त्रास, मळमळ, उलट्या कित्येक त्रास वाढू लागतात. आज आपण हे दोन्ही प्रश्न सोडवणारा उपाय पाहणार आहोत.
SP गार्डनिंग मराठी या युट्युब चॅनेल वर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये घरच्या घरी कुंडीत अळूची पाने वाढवण्याचा उपाय सांगितलेला आहे. यासाठी तुम्हाला एकदा छान अळू आणून कुंडीत लावावा लागेल पण त्यानंतर तुम्हाला एक नवा रुपया सुद्धा खर्च करावा लागणार नाही. विशेष म्हणजे खत देण्यासाठी सुद्धा घरगुतीच उपाय या व्हिडिओमध्ये सांगण्यात आला आहे.
अळूची पाने कुंडीत भरभर वाढतील जर..
तुम्हाला अळूची पाने मध्यम आकारापर्यंत वाढू द्यायची आहेत.
मग तुम्हाला मुळापासून दोन ते तीन बोटे अंतर ठेवून अळूचे पण कापायचे आहे.
अळूच्या देठाला पुन्हा पालवी फुटून पाने उगवू लागतात.
लक्षात घ्या मध्यम आकाराचे पान वडी व फदफदे दोन्हीसाठी पुरेसे ठरते त्यापेक्षा जास्त दिवस ते पान वाढू देत असाल तर विनाकारण मुळांची शक्ती पानाला जिवंत ठेवण्यासाठी जाते.
हे ही वाचा<< वर्षभर साखर न खाल्ल्याने शरीराचं काय बदल होतात? कार्तिक आर्यनचा प्रयोग तुमच्या कामी येणार का?
अळूच्या पानाला खत म्हणून पाणी सुद्धा पुरेसे ठरते पण नुसते पाणी वापरण्यापेक्षा घरी डाळ – तांदूळ धुतल्यावर फेकून द्यायचे पाणी साठवून वापरायचे आहे. तुम्ही दोन दिवस पाणी साठवून वापरू शकता किंवा जर ताबडतोब पाणी वापरणार असाल तर त्यात थोडे साधे पाणी टाकून द्रावण पातळ करून मग मुळांशी ओता. यामुळे पानाची झटपट वाढ होण्यास मदत होते.
तुम्हाला ही टीप कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा.