Used Flowers Reuse Hack: श्रावण महिन्यात पूजा-अर्चा, सण-उत्सव यांमुळे घरात फुलांचा सुगंध दरवळत असतो. पण, फुलं एकदा वापरली की, ती थेट कचराकुंडीत जातात. पण, तुम्हाला जर सांगितलं की, हीच वापरलेली फुलं तुमच्यासाठी खूप कामाची असू शकतात. आणि तेही फक्त गरम तव्यावर टाकून? विश्वास बसत नाही ना? मग हा भन्नाट किचन जुगाड तुम्ही जाणून घेतल्याशिवाय राहणारच नाही. नेमकं काय करायचं, आणि तुम्हाला कोणता फायदा होणार ते जाणून घ्या….
एका महिलेनं दाखवलेला हा जुगाड इतका सोपा आहे की, एकदा पाहिल्यावर तुम्हीसुद्धा करून पाहाल. काय करायचं? तर वापरलेली फुलं घ्या आणि ती गरम तव्यावर टाका. फुलं कुरकुरीत होईपर्यंत भाजा. उन्हाळ्यात तर ही फुलं उन्हातही वाळवू शकता. परंतु, सध्या पावसाळा सुरू असल्याने तुम्हाला ही फुलं तव्यावर गरम करावी लागतील. नंतर ती प्लेटमध्ये काढून नीट कुस्करून चाळून घ्या. हातात येईल दोन प्रकारचा खजिना – एक पावडर आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या पाकळ्या.
पावडरचा वापर करून तुम्ही घरगुती धूप तयार करू शकता. पावडरमध्ये कापूर गोळी कुस्करून टाका, चंदन पावडर किंवा धूप स्टिकची पावडर मिसळा. त्यात तूप किंवा तेल टाकून नीट एकत्र करा. आता त्याचे शंकूसारखे धूप किंवा गोल, चपटे गोळे बनवा. शंकू थेट जाळा, तर गोल धुपात कापूर ठेवून पेटवा. पूजा, ध्यान किंवा सुगंधासाठी हा धूप एकदम मस्त.
आणि उरलेल्या मोठ्या पाकळ्या? त्या फेकायच्या नाहीत. त्या मातीच्या भांड्यात घ्या, त्यात तमालपत्र आणि कापूर टाका. सकाळ-संध्याकाळ हे मिश्रण जाळलं, तर घरातील कुबट वास दूर होईल, वातावरण सुगंधित बनेल आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे डासांचा बंदोबस्त होईल.
थोडक्यात, बाजारातील रसायनयुक्त धूप वापरण्यापेक्षा तुम्ही नैसर्गिक आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी धूप तयार करू शकता. कचऱ्यात जाणारी फुलं आता घरात सुगंध, स्वच्छता आणि आरोग्य आणणारी ठरणार. हा व्हायरल किचन जुगाड केवळ पर्यावरणपूरकच नाही, तर तुमच्या घराला मिळवून देणार ताजेपणा आणि सकारात्मकता.
फुलं फेकायची का? की त्यांचं सोनं करायचं आता निर्णय तुमचा!
Puneri tadka या यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा जुगाड करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
येथे पाहा व्हिडीओ
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)