Small Habits To Lose Weight : आपल्याला बऱ्याचदा असे वाटते की, वजन कमी करणे म्हणजे खाण्यावर बंधन, सौम्य आहार आणि बरंच काही… पण खरं काय? तर जीवनशैलीत छोटे, सातत्यपूर्ण बदल केल्याने कालांतराने मोठे आणि चांगले परिणाम तुमच्या आयुष्यात होऊ शकतात. त्यामुळे फक्त काही दैनंदिन सवयींमध्ये बदल करून, तुम्ही ५ ते १० किलो वजन तुम्ही कमी करू शकता. पण, आपल्यातील अनेकांना हा बदल करणे कठीण जाईल. त्यामुळे पुढील १० लहान बदल सातत्याने केल्यास ते तुमच्यासाठी जादूसारखे काम करणार आहे…

त्यामुळे पुढील दहा लहान बदल सातत्याने केल्यास जादूसारखे काम करणार आहे…

१. फळांचा रस – फळांचे रस आरोग्यदायी असले तरीही त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते. संत्र्याचा रस पिण्याऐवजी संपूर्ण संत्र खाल्ल्याने तुम्हाला फायबर मिळतील आणि पोट सतत भरलेले राहील.

२. बाजरी किंवा तपकिरी तांदूळ – या एका छोट्याशा बदलामुळे तुम्हाला जास्त फायबर मिळतील आणि तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर राहील. तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटेल, ज्यामुळे नंतर खाण्याची इच्छा कमी होईल

३. पायऱ्या निवडा – दिवसातून लिफ्टऐवजी पायऱ्यांनी चढ-उतार केल्याने १०० ते २०० कॅलरीज बर्न होऊ शकतात. त्यामुळे जिममध्ये वेळ न घालवता, असे लहान व्यायाम तुम्ही दिवसभरात करू शकता.

४. जेवणापूर्वी पाणी प्या – जेवणापूर्वी एक ग्लास पाणी प्यायल्याने नैसर्गिकरीत्या थोडं कमी खाण्याची सवय लागते. कारण- कधी कधी आपल्याला भूक लागली, असं वाटतं; पण खरं तर ती तहान असते. पाणी प्यायल्याने तहान भागते आणि भूकही कमी लागते.

५. तळण्याऐवजी भाजून घ्या – क्रंच, कमी कॅलरीज आणि अधिक पोषक तत्वांसाठी चिप्स व पकोड्यांऐवजी भाजलेले मखाना, चणे, काजू खा.

६. कॉलवर बोलताना चला – बसण्याऐवजी कामावर असताना किंवा वैयक्तिक कॉल चालू असताना इकडे-तिकडे चालत जा. २० ते ३० मिनिटांचा चालण्याचा कॉलदेखील तुम्हाला जास्त चालण्यास प्रवृत्त करतो.

७. चहा आणि कॉफीत साखर कमी टाका – जर तुम्ही दिवसातून दोनदा चहा किंवा कॉफीचे सेवन करीत असाल, तर अर्धा चमचा साखर कमी टाका किंवा साखर टाकूच नका. त्यामुळे शेकडो कॅलरीज कमी होतात.

८. फळे किंवा दही खा – मध्यरात्री भूक लागल्यावर दही, केळी किंवा एखादे आवडीचे फळ खाऊ शकता.

९. जेवणासाठी लहान प्लेट्स वापरा – संशोधनातून असे दिसून आले आहे की, जेव्हा तुम्ही लहान प्लेटमध्ये जेवता तेव्हा अन्न ताटात जास्त दिसते. त्यामुळे आपण कमी खातो.

१०. जास्त झोपा – झोपेचा अभाव तुमचा चयापचयाचा दर कमी करतो. रात्री उशिरापर्यंत झोपण्याऐवजी सात ते आठ तासांची झोप घेतल्याने तुमचे वजन कमी करण्याचा प्रवास बदलू शकतो.

वजन कमी करण्यासाठी ठरावीक आहार न घेता, तुमच्या जीवनशैलीत हे छोटे बदल समाविष्ट केलेत, तर तुमचे आवडते पदार्थ मर्यादित प्रमाणात खाल्लेत, तर तुमचे वजन कमी होईल.