Best Foods For Diabetes : चाळिशी पार केल्यावर शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी होऊ लागते आणि त्यानंतर मधुमेह, हृदयाचे विकार असे त्रास असल्याचे निदर्शनास येते. पण, आता चाळिशी नाही, तर अलीकडील तरुणांसहित लहान मुलांमध्येही हा आजार होत असल्याचे दिसून आले आहे. तुमचे शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही किंवा तयार झालेले इन्सुलिन शरीराद्वारे योग्य रीत्या वापरत नाही. त्यामुळे शेवटी तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते, जी तुमच्या एकूण आरोग्यावर परिणाम करू लागते.
मधुमेह हा आजार औषधे आणि जीवनशैलीतील काही बदलांमुळे कमी होऊ शकतो. तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यात तुमचा आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. योग्य आहार आणि निरोगी जीवनशैली रक्तातील साखर कमी होण्यास मदत होऊ शकते आणि काही प्रकरणांमध्ये ही स्थिती उलटदेखील होऊ शकते. पण, तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. पुढील काही भाज्या तुम्हाला मधुमेह रोखण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करू शकतात…
पालक
या भाजीमध्ये कार्बोहायड्रेट्स, कॅलरीज कमी आणि फायबर, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन के जास्त असतात. त्यामुळे रक्तातील साखर कमी होण्यास मदत होऊ शकते. पालकमध्ये अल्फा-लिपोइक ॲसिडदेखील असते; जे तुमच्या शरीरातील इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास मदत करू शकतात.
भेंडी
भेंडी फायबरचे पॉवरहाऊस आहे; ज्यात पचन आणि साखरेचे शोषण कमी करण्याची ताकद असते. त्यात मायरिसेटिनसारखी संयुगेदेखील असतात, जी रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात.
कारले
कारल्यामध्ये पॉलीपेप्टाइड-पी नावाचे एक संयुग असते; जे इन्सुलिनसारखे कार्य करतात. त्याशिवाय त्यात चारँटिन नावाचा घटकसुद्धा असतो. या दोन्ही गोष्टी रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात. म्हणूनच मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी पारंपरिक औषधांमध्ये आणि घरगुती उपायांमध्ये कारल्याचा खूप वापर केला जातो.
ब्रोकोली
ब्रोकोलीमध्ये सल्फोराफेन भरपूर प्रमाणात असते. ब्रोकोली दाहकविरोधी गुणधर्मांसाठी आणि रक्तातील साखर कमी करण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जाते. ब्रोकोली हे मधुमेहासाठी अनुकूल असे सुपरफूड आहे. त्यात फायबरदेखील जास्त असते, जे ग्लुकोज शोषण कमी करते आणि साखरेच्या वाढीस प्रतिबंध घालतात.
रताळे
नेहमीच्या बटाट्यांपेक्षा रताळ्यांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. रताळे फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असते. त्यामुळे रक्तप्रवाहात साखर हळूहळू सोडली जाते, ज्यामुळे ग्लुकोजच्या पातळीत अचानक वाढ होण्यास प्रतिबंध घातला जातो.