Grandma’s Homemade Pickle And Gut Health : लहानपणी आजीने घरी बनवलेल्या लोणच्याची चव तुम्ही सगळ्यांनी नक्कीच चाखून बघितली असेल. त्या लोणच्यामध्ये तिखट चव, विविध मसाल्यांचे एकत्रीकरण आणि आजीच्या हाताच्या प्रेमाचा गोडवा सुद्धा असायचा. पण, तुम्हाला माहित आहे का? त्या काळातील लोणच्याच्या चवीमागे आतड्यांचे आरोग्याचे एक रहस्य लपलेलं आहे; जे आधुनिक विज्ञानाला आता हळूहळू समजायला लागले आहे. म्हणजेच आजीने बनवलेले लोणचं एक नैसर्गिक प्रोबायोटिक मशीन आहे.
लोणच्यामुळे जेवणाची चव आणखीन वाढते. त्यामुळे एखादा डब्बा किंवा लोणच्याची पाकिटे आपल्या घरी उपलब्ध असतात. पण, पूर्वी आजी-आजोबा पारंपारिक पद्धतीने हंगामी फळे आणि भाज्या जतन करून ठेवायचे. आंबवणे हे त्यापैकीच एक होते. उपलब्ध असलेले अन्नपदार्थ अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी ही पद्धत वापरली जायची. भारतातील पारंपरिक लोणच्यांमध्ये आंबा आणि लिंबू आणि मिक्स भाज्यांच्या लोणच्यांचा समावेश असतो. काही लोणची उन्हात ठेवून नैसर्गिकरीत्या आंबवली जातात. ही नैसर्गिक प्रक्रिया केवळ अन्नाचे जतन करत नाही तर चांगले बॅक्टेरिया किंवा प्रोबायोटिक्स देखील तयार करते; जे तुमच्या आतड्यांसाठी फायदेशीर असतात.
बॅक्टेरियायुक्त लोणचे कसे तयार होते?
- ताजी फळे / भाज्या मीठ, मसाले घालून तेलात मिसळल्या जातात.
- एक सीलबंद भांडे सूर्यप्रकाशात ठेवले जाते.
- त्यानंतर भाज्यांच्या पृष्ठभागावर नैसर्गिकरित्या उपस्थित असणारे लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया वाढतात आणि साखरेला आंबवतात.
- यामुळे आंबट, सुरक्षित आणि बॅक्टेरियायुक्त लोणचे तयार होते.
- यामुळे फायदेशीर सूक्ष्मजंतूचे पचन सुधारू शकते, रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते.
आतड्यांचे आरोग्यसाठी लोणचं कसं ठरतं फायदेशीर
पचनक्रिया सुधारते – आंबवलेल्या लोणच्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स अन्नाचे विघटन करण्यास आणि पोषक तत्वे अधिक कार्यक्षमतेने शोषण्यास मदत करतात.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते – पंचनसंस्था मजबूत असेल तर रोगप्रतिकारशक्ती वाढते. कारण – शरीरातील सुमारे ७० टक्के रोगप्रतिकारक पेशी या आतड्यांमध्ये असतात.
पोटफुगी कमी करण्यात मदत – लोणचं खाल्ल्यावर फायदेशीर बॅक्टेरिया हानिकारक सूक्ष्मजंतूंना नियंत्रणात ठेवून गॅस आणि पोटफुगी कमी करण्यास देखील मदत करू शकतात.
पोषण वाढवते – नैसर्गिकरित्या आंबवलेल्या लोणच्यामध्ये व्हिटॅमिन बी, के आणि फायदेशीर एंजाइम्सचे प्रमाण जास्त असते.