How To Detect Nutrient Deficiency : भूक लागल्यावर, पोट बिघडल्यावर किंवा एखादा आजार होण्याआधी आपलं शरीर आपल्याला संकेत देत असते. पण, तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या शरीरात आवश्यक पोषक तत्वांची कमतरता आहे का हे जाणून घेण्यासाठीसुद्धा शरीरातील काही अवयव संकेत द्यायला सुरुवात करतात. तर याच लक्षणांबद्दल आपण या बातमीतून जाणून घेऊयात…
सुप्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉक्टर सौरभ सेठी यांनी आठ सामान्य लक्षणे अधोरेखित केली आहेत, जी तुमच्या शरीरात आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असल्याचे दर्शवू शकतात. पुढील आठ लक्षणे तुमच्यात पौष्टिकतेची कमतरता असल्याचे संकेत देतात…
१. सतत थकवा जाणवणे
तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल तर तुमच्या शरीरात लोह, व्हिटॅमिन बी १२ किंवा मॅग्नेशियमची कमतरता आहे. हे पोषक घटक तुमच्या शरीरातील ऑक्सिजन आणि ऊर्जा चयापचयासाठी भरपूर महत्त्वाचे असतात.
२. केस गळणे आणि ठिसूळ नखे
तुम्हाला विश्वास बसणार नाही पण कमकुवत नखे आणि केस गळतीत वाढ होणे हे संकेत तुमच्या शरीरात झिंक, बायोटिन, प्रथिने किंवा लोहाची कमतरता दर्शवतो. जेव्हा आपण शरीराला कमी प्रमाणात पोषण देतो तेव्हा तो नखं, केस आदी कमी महत्वाच्या भागांकडे लक्ष देणे थांबवतो. त्यामुळे केस गळणे आणि नखे ठिसूळ होणे आदी समस्या जाणवू लागतात.
३. सतत थंडी वाजणे
तुम्हाला जर सतत थंडी वाजत असेल किंवा हात-पाय थंड पडत असतील तर तुमच्या शरीरात आयोडीन किंवा लोहाची कमतरता आहे. थायरॉईडच्या कार्यासाठी आणि लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी शरीरात खनिजे आवश्यक आहेत, त्यामुळे सतत थंडी जाणवण्याचे स्पष्ट कारण तुमच्याकडे नसल्यास तुम्ही डॉक्टरांशी याबद्दल बोलू शकता.
४. स्नायूंमध्ये पेटके येणे
तुमच्या स्नायूंमध्ये वारंवार पेटके येत असतील तर तुमच्या शरीरात मॅग्नेशियम, पोटॅशियम किंवा कॅल्शियमची पातळी कमी असू शकते. ही खनिजे स्नायूंच्या कार्यात आणि मज्जातंतूंच्या प्रसारात महत्त्वाची भूमिका बजावतात. खराब पचनक्रिया शोषणात आणखी बिघाड करू शकतात.
५. लक्ष केंद्रित करण्यास अडचण
तुमच्या शरीरात ओमेगा-३, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी१२ किंवा कोलीनची कमी असल्यास लक्ष केंद्रित करण्यास अडचण येऊ शकते. मेंदूच्या विकासासाठी आणि योग्य न्यूरोट्रांसमीटर कार्यासाठी हे पोषक घटक महत्त्वाचे असतात.
६. हिरड्यांना सूज किंवा रक्त येणे
तुमच्या हिरड्यांमधून रक्त येत असेल तर तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन सी किंवा व्हिटॅमिन के ची कमतरता आहे. व्हिटॅमिन सी कोलेजन तयार करण्यास मदत करते, तर व्हिटॅमिन के रक्त गोठण्यास महत्त्वाची भूमिका बजावते.
७. तोंडात भेगा पडणे
तुमच्या शरीरात तोंडाच्या कोपऱ्यात वारंवार भेगा पडणे किंवा फोड येत असेल तर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी२, बी६ किंवा लोह कमी आहे. तुम्हाला ही समस्या सारखी जाणवत असेल तर तुमच्या पौष्टिक आहाराचे पुनर्मूल्यांकन करण्याची गरज आहे.
८. भूक न लागणे
तुमच्या शरीरात लोह, जस्त किंवा व्हिटॅमिन बी १२ कमी असतील तर तुम्हाला भूक न लागणे किंवा बर्फ किंवा मातीसारख्या गैर-खाद्य पदार्थ खाण्याची इच्छा होणे आदी समस्या जाणवतात, यामुळे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.
तुम्हाला आवश्यक पोषक तत्वांची आवश्यकता आहे याबद्दल शरीर संकेत देतं. तुमचे शरीर काय संवाद साधत आहे हे समजून घेण्यासाठी डॉक्टर सेठी यांची यादी ही एक उपयुक्त यादी आहे. जर यापैकी कोणतेही लक्षण कायम राहिले तर, आरोग्य सेवा प्रदात्याशी बोला आणि तुमच्या आहाराचा त्यांचा समावेश करण्याचा विचार करा.