Gas & Flatulency In Stomach: पोटातील गॅस बाहेर पडणे हे शरीराचे एक नैसर्गिक कार्य आहे जे तुम्ही जागे असताना किंवा झोपेत पार पडते. परिस्थिती लक्षात घेऊन तुम्ही जागे असताना ही क्रिया नियंत्रणात ठेवू शकता पण झोपेत हे शक्य होईलच असे नाही. याविषयी अनेकांच्या मनात चिंता असते. आज आपण तज्ज्ञांकडून याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. हैदराबादच्या यशोदा हॉस्पिटल्सचे सल्लागार जनरल फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉ रंगा संतोष कुमार यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, “तुमच्या पचनमार्गात वायू होणे आणि झोपेत बाहेर पडणे हे सामान्य आहे, विशेषत: तुम्ही रात्रीचे जेवण केल्यानंतर काही वेळातच झोपायला गेलात तर हा त्रास वाढू शकतो.”

डॉ कुमार म्हणाले की, जसे शरीर अन्न पचवते तसे जीवाणू नैसर्गिकरित्या मोठ्या आतड्यात वायू तयार करतात. काही प्रमाणात गॅस सामान्य असला तरी, हवा गिळणे, काही पदार्थ खाणे, गर्भधारणा आणि मासिक पाळी आणि विविध प्रकारचे पाचक विकार यामुळे जास्त गॅस होऊ शकतो. डॉ कुमार यांच्या मते, सरासरी व्यक्तीच्या शरीरातून दिवसातून सुमारे १३ ते २१ वेळा गॅस बाहेर पडतो. एखादी व्यक्ती जागृत असतानाच मोठ्या प्रमाणात गॅस बाहेर पडतो कारण जेव्हा तम्ही झोपता तेव्हा पचनसंस्था मंदावते, ज्यामुळे वायूचे प्रमाण निम्म्याने कमी होते. पण झोप लागल्यानंतर गुदद्वाराच्या स्फिंक्टरमधील स्नायू शिथिल होतात आणि वायू अनैच्छिकपणे जातो, असे डॉ कुमार यांनी स्पष्ट केले.”

गॅस ही सहसा काळजी करण्यासारखी गोष्ट नसते, तरीही वेदना, उलट्या किंवा वजन कमी होणे यासारख्या इतर लक्षणांसह हा त्रास होत असल्यास हे आरोग्य समस्येचे लक्षण असू शकते.

काय लक्षात ठेवावे?

प्रत्येकजण काही प्रमाणात हवा गिळतो, परंतु जास्त हवा गिळल्याने गॅस वाढू शकतो. “गिळलेली हवा जी ढेकर देऊन मुक्त होत नाही ती तयार होत जाते आणि ती गुदद्वारावाटे सोडली जाते. बोलताना व खाताना, श्वास घेताना हवा गिळण्यासह खाली दिलेल्या काही मुख्य चुका आपण टाळायला हव्यात.

  • धुम्रपान
  • खूप वेगाने खाणे किंवा उभे राहून खाणे
  • स्ट्रॉ वापरून ज्यूस, पाणी पिणे
  • चिडचिड किंवा चिंता
  • नीट न बसणारे दातांचे कव्हर (डेन्चर) घालणे
  • सतत च्युईंग गम चघळणे

गॅसचे प्रमाण कमी करण्यासाठी काय खाणे टाळावे?

डॉ कुमार यांनी नमूद केले की काही खाद्यपदार्थ ज्यात फायबर, शर्करा आणि स्टार्च अधिक असते त्यामुळे मोठ्या आतड्यात गॅस वाढण्याची शक्यता असते. आता यातही मुख्य ट्विस्ट असा की, “प्रत्येकाच्या शरीरावर प्रत्येक पदार्थांचा समान परिणाम होत नाही, परंतु गॅस वाढवण्यासाठी ओळखल्या जाणार्‍या काही पदार्थांमध्ये डेअरी, बीन्स, फळे, काही भाज्या, (शतावरी, ब्रसेल स्प्राउट्स, ब्रोकोली, कॉर्न, बटाटे) ब्रेड आणि संपूर्ण धान्यापासून बनवलेले इतर पदार्थ यांचा समावेश होतो. कार्बोनेटेड शीतपेये, जसे की सोडा आणि सेल्टझर आणि कृत्रिम स्वीटनर्स सुद्धा अधिक गॅसचे कारण ठरू शकते.

हे ही वाचा<< श्रेयस तळपदेने २८ वर्षं केलेली ‘ही’ गोष्ट ठरली हार्टअटॅकचं मोठं कारण; तुम्ही अशी चूक करताय का? डॉक्टरांनी दिलं उत्तर

गॅस वाढणे हे केवळ इथवरच मर्यादित न राहता पाचन विकार जसे की, बद्धकोष्ठता, इरिटेबल बोवेल सिंड्रोम किंवा IBS, क्रोहन रोग, सेलिआक रोग, लहान आतड्यांतील बॅक्टेरियाची अतिवृद्धी आणि गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स असे त्रास वाढण्याचे सुद्धा कारण ठरू शकते.