हल्ली तरुणांमध्ये रिलेशनशिप हा शब्द अगदी सहज उच्चारला जातो. पण ही रिलेशनशिप म्हणजे नेमकं काय? यात प्रेम आहे, लग्नापर्यंत पोहोचणारं हे नातं आहे की केवळ क्षणिक सोयीस्कर मिरवण्याचं समीकरण?

राउंड मारून बसू का नको अशा विचारात असतानाच कट्टय़ावरच्या पाच-सहा मुलींच्या रिलेशनशिप म्हणजे नातं नसतं यातल्या एका वाक्याने मला बसायला भागच पाडलं. या त्यांच्यातली एक मुलगी अगदी तावातावाने फोनवर जोरजोरात भांडत होती. ‘ठिके ना यार मला नव्हतं जमणार. एवढय़ा उशिरा यायला तर इतका इश्यू करण्यासारखं काये? बघ तुलाही नाहीच पटत आहे ना माझं काही. मग थांबवूया ना सगळंच. कटकटच नको आपल्याला…मला नाही राहायचं आता या रिलेशनशिपमध्ये. ब्रेकअप.. बाय’

मीही व्यवस्थित सरकून तिचं ऐकता येईल अशी बसले. रिलेशनशिप म्हणजे नातं नसतं? मग काय? ती आता रडणारच बहुतेक असं वाटून त्या मुली जमेल तितकं सेंटी तोंडं करून म्हणाल्या, ‘अगं रेवा, असं नसतं गं. तू बोल ना त्याच्याशी, समजाव त्याला, तुमचं काय खटकतंय ते सांगा ना, सुटेल हा गुंता.. एवढं प्रेम आहे ना तुमचं एकमेकांवर होईल काहीतरी..’ एवढय़ात ती रेवा फटकन बोलली, ‘चलं गं. प्रेमबीम नव्हतंच माझं त्याच्यावर’ अगं मग हे जे होतं ते काय नक्की? किंचाळल्याच त्या सगळ्या जवळजवळ.. माझीही उत्सुकता ताणली गेली.

‘चिल यार.. आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो फक्त आणि रिलेशनशिप म्हणजे काही प्रेम नाही गं. प्रेम आणि नातंबितं या बोिरग कन्सेप्ट्स आहेत गाइज..’’

‘अगं काय बोलते आहेस तू? कळतंय का? त्याच्याशी तासंतास फोनवर बोलायचीस त्याचं काय?

‘अरे ते असंच यार आपलं आणि रिलेशनशिपमध्ये असताना असं बोलावं लागतं अगं आणि तसंही जिओ कार्ड होतं यार..फ्री मे चलता है..’

‘तुझं लेक्चर बंक करून जाणं त्यासाठी आम्हाला खोटं बोलायला लावायचीस आणि स्वत:देखील घरच्यांशी खोटं बोलायचीस ते कशाला म?’ आता त्यांनी अगदी फैलावरच घेतली तिला.

‘अरे काय यार एवढय़ावरून तुम्हाला असं वाटलं माझं प्रेम आहे? असं नसतं गं काही, आणि बघ ते सोशल साइटवरचे फोटोज डिलीट करता येतात आणि टॅटूच्या इनिशियलचाच प्रश्न असेल तर त्यावर नवीन डिझाइन काढता येतेच की..’

या रेवाच्याच जगात राहणाऱ्या, वावरणाऱ्या वयाच्या मुलींना आणि मलाही नात्यांच्या असण्याचे आणि दिसण्याचे नवीनच अर्थ उलगडत होते. मग प्रेम म्हणजे नक्की काय? माझ्या मनातला प्रश्न त्यातल्या एका मुलीने विचारलाच..

‘आम्ही फक्त रिलेशनशिप होतो बाकी काही नव्हतं गं आमच्यात तसं.. प्रेम वेगळं आणि रिलेशनशिप वेगळी. आवडणं आणि प्रेम या वेगळ्या गोष्टी असतात. आवडलं कीमाणूस कन्फेस करतो आणि कन्फेस करणं म्हणजे फक्त सांगणं. कन्फेस म्हणजे काही कमिटमेंट नव्हे. आणि जिथे कमिटमेंट नाही तिथे नातं कुठून येणार? आम्ही जस्ट भेटायचो, बोलायचो, एकमेकांना आवडायचो इतकंच, लाइक करायचो फक्त. आणि म्हणूनच बरोबर होतो. यात कुठेही नातं, भावना, प्रेम, आपुलकी नव्हतीच ते होतं फक्त बरोबर असणं म्हणजेच रिलेशनशिप.’
खरंतर मला उशीर होत होता, पण त्या मुलीने माझ्या मनातले नात्यांचे सगळे अर्थच बदलले होते. ती सांगतच राहिली तिच्या दादाच्या ग्रुप्समध्ये तर म्हणे बेट लावून मुली पटवतात. तू पटवतोस का मी? चल हिला पटवूनच दाखव; या अशा चॅलेंजेसमुळे रिलेशनशिप्स तयार होतात. ज्यात फक्त आकर्षण किंवा शारीरिक गरज एवढाच भाग असतो. बोलता बोलता बॉयफ्रेण्ड आणि गर्लफ्रेण्ड मटेरियल म्हणजे रिलेशनशिपमध्ये राहण्यायोग्य मुलंमुली अशी कम्प्लीट बाउन्सर व्याख्या ती देऊन गेली. बऱ्याच वेळेस रिलेशनशिप्स, या ग्रुपमध्ये फक्त माझाच बॉयफ्रेण्ड, गर्लफ्रेण्ड नाही या दु:खी भावनेनेही सुरू होतात. बरोबरी करण्यासाठी नात्यापलीकडचं बरोबर राहणं फक्त. यातली काही रिलेशनशिप अगदी खरी असतातदेखील. प्रेमाच्या भावनेतून सुरू झालेली आणि नातं आहे असं मानणारी. त्यांच्यासाठी एखादा माणूस आवडला की नातं जुळलेलंच असतं. नातं जुळायला किंवा तयार व्हायला काही लागतं हेच मुळात त्यांना माहिती नसतं. माझ्या एका मैत्रिणीचा अनुभव. तिला आवडला एक मुलगा. सांगितलं त्याला. पटलं त्यांचं. आज ११ र्वष झाली ते एकत्र आहेत. आणि त्यांना विचारही करावासा वाटला नाही नातं आहे का नाही याचा? प्रेम असणं हेच खूप असतं काहीजणांसाठी.

मी उठले आणि निघाले, पण विचार मात्र तिथेच थांबलेले. त्या रेवाच्या ग्रुपमधल्या मुलींसारखीच आपलीही अवस्था झालीये. बरोबर असणं, आवडणं, कन्फेस, कमिटमेंट, प्रेम, नातं या गोष्टी टप्प्याटप्प्याने होत जातात असाच आपला समज(?) होता. आपण विचारही केलेला नसतो या गोष्टींचा कधी आणि नातं का रिलेशन असा प्रश्न येतो? काय करायचं हे आपल्यावर असतं, नातं नसणारं रिलेशन हवंय की असं प्रेम ज्यात नातं आहे की नाही हेदेखील आठवायला लागू नये?

निर्णय तुमचा आहे!!!

response.lokprabha@expressindia.com

सौजन्य- लोकप्रभा