How Can Help Child With Bed Wetting : रात्री झोपताना अनेक मुले अंथरुणावर लघवी करतात. जन्मल्यापासून ते अगदी दोन वर्षांपर्यंतच्या मुलांना अंथरुणात लघवी करण्याची सवय असते. कारण- अशा लहान मुलांचा मेंदू त्यांना रात्री झोपेत असताना शौचालयात जाण्याचा आवश्यक तो सिग्नल देऊ शकत नाही. लहान मुलांचे मूत्राशय पूर्णपणे विकसित झालेला नसते आणि त्यामुळे ही मुले लघवी जास्त वेळ थांबवू शकत नाहीत.

पण, अंथरुण ओले करण्याची ही सवय त्यांच्या पालकांना खूप त्रास देते. मग झोपायची आधी त्यांना लघवीला घेऊन जावे लागते. एवढेच नाही, तर अशा मुलांना अलार्म लावून रात्री जबरदस्तीने उठवून बाथरूममध्ये घेऊन जावे लागते. त्याचबरोबर रोज अंथरुणात लघवी केल्यामुळे सतत चादर धुऊन ठेवावी लागते किंवा अंथरुणावर मॅट ठेवावी लागते.

पण, जेव्हा मुले दोन वर्षांपेक्षा जास्त मोठी असतात तेव्हा त्यांचे पालक त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात की, त्यांना लघवी करण्यासाठी एका विशिष्ट ठिकाणी जावे लागते. पण, जर तुमचे मूल पाच ते सहा वर्षांचे आहे आणि अजूनही त्याची अंथरुणात लघवी करण्याची सवय गेली नसेल, तर अशा परिस्थितीत तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा पुढील काही उपाय करून, ती सवय सोडवण्याचा प्रयत्न करा.

मुलांना अंथरुणात लघवी करण्यापासून कसे थांबवायचे?

मुले दोन वर्षांची असोत किंवा पाच ते सात वर्षांच्या काही लहान मुलांना रात्री झोपेत असताना लघवी आली आहे हे समजत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत संध्याकाळी मुलांना खारट नाश्ता, साखरयुक्त पेये देऊ नका. त्यामुळे मुलांना रात्री जास्त लघवी होऊ शकते. त्याशिवाय रात्री ८ नंतर त्यांना द्रव पदार्थ देणे थांबवा आणि मुलाला वेळेवर झोपवा. मुलाला झोपवण्यापूर्वी त्याला लघवी करायला लावा. असे केल्याने, अंथरुणात लघवी होण्याची शक्यता फार कमी असते .

पुढील गोष्टी खायला द्या…

सुके खजूर : झोपण्यापूर्वी सुकलेल्या खजुराचे तुकडे खायला द्या.

अक्रोड : मुलाला दररोज दोन अक्रोड आणि १० मनुके खायला द्या. असे केल्याने अंथरुणात लघवी करण्याची सवय कमी होऊ लागेल.