Homemade Weight Loss Remedies : आजकाल बरेच लोक त्यांच्या वाढत्या वजनाबद्दल चिंतेत असतात. आपण जेव्हा वजन कमी करण्याचा विचार करतो, तेव्हा फक्त कमी खाणं आणि बारीक होणं हेच लक्षात ठेवतो. वजन नियंत्रित करण्यासाठी लोक जेवायचं सोडतात, तर कधी जिममध्ये जातात. पण, एवढं सगळं करूनही त्यांचे वजन कमी होत नाही. त्यामुळे आहारावर नियंत्रण आणि व्यायाम करण्याबरोबर तुम्ही काही घरगुती उपायांचाही अवलंब केला पाहिजे.

आयुर्वेदात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत की, ज्या पोट आणि चयापचय यांसाठी खूप महत्त्वाच्या ठरतात. त्यांचे सेवन केल्याने अन्न लवकर पचते. आणि जेव्हा दिवसभर खाल्लेले अन्न व्यवस्थित पचू लागते, तेव्हा तुमचे वजन वाढत नाही. त्यामुळे शरीरावर जमा झालेली चरबी काढून टाकण्यासदेखील मदत होते.

वजन घटवण्यास साह्यभूत ठरणारे खास पेय (Ajwain And Hing Water)

वजन कमी करण्यासाठी तुम्ही एक खास पेय तयार करू शकता. हे पेय बनविण्यासाठी तुम्हाला फक्त हिंग आणि ओवा या दोन्ही गोष्टी पाण्यात टाकाव्या लागतील. त्यांनतर पाणी रात्रभर तसेच ठेवा आणि सकाळी उठल्यावर ते प्या. जर तुम्ही दररोज जेवणानंतर किंवा सकाळी रिकाम्या पोटी या पेयाचे सेवन केले, तर त्यामुळे तुमचे वजन कमी करण्यास मदत मिळेल.

कसा होतो फायदा?

हिंग आणि ओवा पाणी चयापचय वाढवण्यास प्रभावी आहे, ज्यामुळे तुम्हाला जास्त कॅलरीज बर्न करण्यास मदत होते आणि तुमचे वजन संतुलित राहते. त्याशिवाय या पाण्याचे सेवन केल्याने अन्नातील पोषक घटक पूर्णपणे शोषण्यास मदत होते; ज्यामुळे शरीरात चरबी कमी जमा होते आणि वजन कमी करण्यासही मदत होते.

हिंग-ओव्याचे पाणी पिण्याचे फायदे

शरीरातील चरबी कमी करण्याव्यतिरिक्त हिंग आणि ओव्याचे पाणी प्यायल्याने तुम्हाला इतर अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो. मासिक पाळीतील वेदना कमी होतात, पचनक्रिया निरोगी राहते. कारण– त्यात दाहकविरोधी आणि जीवाणूविरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, अ‍ॅसिडिटी इत्यादी समस्यांपासून आराम मिळतो.