How To Flirt With Wife Husband: फ्लर्ट म्हणजे काय? आता काही जण म्हणतील की उगाच आपलं पाश्चात्य संस्कृतीमधून आलेलं खूळ आहे. पण खरं सांगायचं तर नवरा बायकोच्या नात्यात गोडवा कसा टिकवून ठेवावा हे भारतीयांना इतरांकडून शिकण्याची गरजच नाही. अगदी जुन्या काळातील चित्रपट जरी पाहिलेत तरी तुमच्या लक्षात येईल, नातेवाइकांसमोर इशाऱ्यांमध्ये एकमेकांशी बोलून नवरा बायकोने शब्दांविना साधलेला संवाद हा साधारण प्रत्येक चित्रपट- मालिकेचा एक महत्त्वाचा भाग असायचा. किंबहुना कोणत्या ना कोणत्या रूपात अजूनही हे सीन दाखवले जातातच. अलीकडे कामाच्या व्यापात खऱ्या आयुष्यातून मात्र हे फ्लर्ट रुपी संवाद हरवत चालले आहेत आणि भांडणाच्या अनेक कारणांमध्ये फ्लर्ट न करणं हे सगळ्यात मोठं निमित्त ठरत आहे. आज आपण नवरा बायकोने एकमेकांशी फ्लर्ट का करायला हवं याची पाच सोपी कारणे पाहूया…

१) आकर्षण वाढेल

लग्नानंतर आपण एखाद्या माणसाच्या अवतीभोवती निदान दिवसातील १२ तास तरी राहणार असतो. अशावेळी ती व्यक्ती आपल्याला नेहमीच छान तयार झाल्याचा आत्मविश्वास घेऊन दिसणार नाही. यामुळे कुठेतरी तुमच्या नवरा किंवा बायकोच स्वतःविषयी आकर्षण कमी झालेलं असतं. जेव्हा तुम्ही त्यांना सहज एखाद्या गोष्टीचं कौतुक करून फ्लर्ट करता तेव्हा त्यांना स्वतःच्या दिसण्याविषयी आत्मविश्वास वाढतो. आणि मग आकर्षण टिकवून ठेवण्यासाठी त्यांना अधिक मेहनत घेण्याची इच्छा होते. तुम्हीच विचार करा, तुम्ही छान दिसताय आज असं म्हटल्यावर तुम्हाला आवडणार नाही का? तसंच तुमच्या पार्टनरला सुद्धा स्वतःविषयी छान वाटायला हवं कारण एखादा माणूस जेव्हा स्वतःवर प्रेम करतो तेव्हाच तो इतरांवर सुद्धा प्रेम करू शकतो.

२) ओढ वाढते

समजा तुमचा प्रेम विवाह असेल तर एकमेकांना प्रत्येक वेळी भेटताना मध्ये निदान पाच- सात तास तरी गेलेले असतात. यामुळे एक ओढ असते. सतत सहवासात राहिल्याने साहजिकच ही ओढ कमी होते. जेव्हा तुम्ही फ्लर्ट करता तेव्हा तुम्हाला जुन्या दिवसांना, आठवणींना उजाळा देता येतो आणि परिणामी एकमेकांमधील हरवलेली ओढ वाढते.

३) बोलायला लागाल

तिसरा मुद्दा महत्त्वाचा आहे. अनेकदा आपल्याला आपल्या जोडीदाराच्या आयुष्यात काय सुरु आहे याविषयी एकत्र राहूनही कल्पना नसते. तुम्ही ते थेट विचारलं तर नेमकं काय सांगावं असा गोंधळ होऊ शकतो. अशावेळी फ्लर्ट करणं, उगाच चिडवणं यामुळे तुमच्यात हसत खेळत बोलणं सुरु होईल आणि मग बोलताना तुम्ही कधी गंभीर विषयांवर तर कधी गप्पा गोष्टींवर स्विच होऊ शकता. मुद्दा काय तर तुमच्या संवाद घडण्यासाठी एक उत्तम सुरुवात होईल.

४) झाकली मूठ सव्वा लाखाची..

आपल्यापैकी अनेकांना, लपवून करायच्या गोष्टींविषयी नैसर्गिकच कुतूहल असतं. त्यामुळे इतरांसमोर आपल्या पार्टनरला मस्करीत चिडवून किंवा प्रेमाने स्तुती करू शकता. प्रसंग ओळखून इतरांसमोर केलेल्या स्तुतीमुळे वाटणारा संकोच हा सुद्धा पॉझिटिव्ह असतो. यात तुमच्या पार्टनरला इतक्या लोकांमध्येही तुमचं त्यांच्याकडे लक्ष आहे याची पोचपावती मिळते .

५) नात्याची किंमत

तुम्हाला नात्याची किंमत कळते. फ्लर्ट करणं हे एक स्किल आहे. म्हणजे समोरच्याला कुठल्या शब्दात काय बोललं की छान वाटू शकतं हे ओळखणं खरं कसब आहे. अनेकदा नवरा बायको एकमेकांच्या गरजा पूर्ण करतात पण त्यांना समोरच्यासाठी विचारांची मेहनत घ्यायला कंटाळा येतो. फ्लर्ट करताना तुम्हाला तुमच्या पार्टनरचा विचार करायचा असतो, ज्यामुळे तुम्हाला आपसूकच नात्याची किंमत कळून जाते. एरवी अनेक जोडप्यांमध्ये ‘Efforts’ न घेणं ही एक सामान्य तक्रार असते, एकही रुपया खर्च न करता तुमचे खरे भावनिक Efforts दाखवण्यासाठी फ्लर्टींग हे सगळ्यात भारी उत्तर आहे. या सगळ्यामुळे ७० टक्के भांडणांचे विषय सुरु होण्याआधीच संपून जाऊ शकतात.

हे ही वाचा<<बाळ कधी होणार? प्रश्नावर ‘प्रसिका’चा स्वतंत्र विचार; ‘चाईल्ड फ्री’ जोडप्याला का व्हायचंय १०० मुलींचे पालक?

यासगळ्याच्या पलीकडे स्वतःच्या जोडीदाराशी फ्लर्ट केल्याने तुमचं काहीही नुकसान तर होणार नाहीये, त्यामुळे आजच विचार करा..