Loaded or Enhanced Water: लोडेड वॉटर किंवा एनहांस्ड वॉट नावाचा एक नवीन ट्रेंड सध्या व्हायरल होत आहे. हे एक साधं पाणी वाटत असलं तरी ते भरपूर व्हिटॅमिन्स, खनिजे, इलेक्ट्रोलाइट्स किंवा हर्बल अर्कांनी समृद्ध असलेले पेय आहे, जे केवळ तहान भागवणारे नाही तर ऊर्जा आणि पोषणाचा उत्तम स्त्रोतदेखील आहे.

हे पाणी का खास आहे?

हे लोडेड वॉटर साधारण बाटलीबंद पाण्यापेक्षा वेगळे मानले जाते. कारण त्यात शरीराला अतिरिक्त फायदे देणारे घटक असतात. व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, बी १२, कॅल्शियम, झिंक, इलेक्ट्रोलाइट्स किंवा अगदी कोलेजन आणि बायोटिन अशा पोषणतत्वांनी परिपूर्ण हे लोडेड वॉटर आहे. काही ब्रँड चव आणि फायदे दोन्ही वाढवण्यासाठी फळांची चव, ग्रीन टी अर्क किंवा अँटी-ऑक्सिडंट्स देखील यात मिसळतात.

चव आणि आरोग्य

सध्या या व्हायरल ट्रेंडप्रमाणेच लोक केवळ हायड्रेशनकडेच नाही, तर फंक्शनल बेव्हरेजेसकडे वळत आहेत. म्हणजेच चव आणि आरोग्य दोन्ही देणारे पेय. हा ट्रेंड वर्कआउट करणाऱ्या तरूणांमध्ये फिटनेस उत्साही आणि डाएट करणाऱ्यांमध्ये वाढत्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. अनेक जण ते स्पोर्ट्स ड्रिंक्ससाठी एक निरोगी पर्याय मानतात. आपल्या देशातील अनेक सेलिब्रिटी अशा प्रकारचे लोडेड वॉटर वापरताना दिसतात. अक्षय कुमारचे डिटॉक्स वॉटर, यामध्ये पाण्यात लिंबू, काकडी आणि पुदिना असे घटक असतात.

याची गरज कोणाला नाही?

तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला दिवसभर योग्य पोषण आणि संतुलित आहार मिळत असेल, तर भरपूर पाणी पिण्याची फारशी गरज नाही. असं असतानाही जर तुम्ही सतत प्रवास करत असाल, व्यस्त असाल किंवा इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्याची गरज असेल, तर हा एक स्मार्ट पर्याय असू शकतो. मात्र काही ब्रँड्स साखर किंवा कृत्रिम फ्लेवर्स यामध्ये मिसळतात, ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात.

लोडेड वॉटर घरच्या घरी कसे तयार करावे?

  • तज्ज्ञ असा सल्ला देतात की, ते बाहेरून कोणत्या तरी ब्रँडचे खरेदी करण्याऐवजी घरी बनवणे अधिक फायदेशीर आणि स्वस्त आहे.
  • फिल्टर केलेले किंवा उकळलेले आणि थंड केलेले पाणी घ्या. टरबूज, लिंबूवर्गीय फळे, लिंबू किंवा संत्री यासराखे इलेक्ट्रोलाइट असलेले एखादे फळ घ्या. पाण्यात हे सर्व घटक जास्त वेळ ठेवू नका. लिंबूवर्गीय फळांच्या साली पाणी कडू बनवू शकतात आणि टरबूज मऊ होऊ शकते. हे पाणी सीलबंद कंटेनर किंवा बाटलीत तयार करून फ्रीजमध्ये ठेवा. २ ते ३ दिवसांच्या आत याचे सेवन करा.
  • तुळशीची पानं टाकूनही तुम्ही पाणी पिऊ शकता.
  • सब्जाच्या बिया टाकूनही पाणी तयार करू शकता. हे उन्हाळ्यात फायदेशीर ठरते.
  • लिंबू आणि पुदिना यासोबतही पाणी बनवू शकता.