रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण. हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बॉलिवूडमध्येही या सणाला विशेष महत्त्व आहे. आपण चित्रपटांमध्ये किंवा काही मोठ्या कार्यक्रमांमध्ये पाहिलं असेल की रंगपंचमी दिवशी बहुतांश वेळा पांढरे कपडे परिधान केले जातात. यामागचं कारण तुम्हाला माहित आहे का?
रंगपंचमीच्या सणाला लोक आपापसांतील मतभेद विसरून एकमेकांना शुभेच्छा देतात. रंगांची उधळण करतात, आनंद साजरा करतात. रंगपंचमीच्या दिवशी बुध-गुरुदित्य योग मानला जातो. हा योग अनेक वर्षांनी तयार होतो. त्यामुळे या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे घालण्याला विशेष महत्त्व असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
पांढरा रंग हा शांततेचं प्रतिक आहे तसंच पांढऱ्या रंगात प्रत्येक रंग खुलून दिसतो. त्यामुळे होळीच्या सणाला पांढरे कपडे खास परिधान केले जातात. पांढऱ्या कपड्यांमधून लोक शांतीचा संदेश देतात, असं मानलं जातं. तसेच, मनातील सगळी जळमटं दूर करून खुल्या मनाने लोकांचा स्विकार करणे हा गुण देखील पांढऱ्या रंगात आहे.
ज्याप्रमाणे पाण्याला रंग नसतो आणि पाण्यात मिसळलेला रंग स्वतःचा बनतो. तसेच पांढऱ्या कपड्याला स्वतःचा रंग नसतो. पांढऱ्या कपड्यावर कोणताही रंग परिधान केला तरी तो त्या रंगाचा बनतो. सर्वात महत्वाचं म्हणजे रंगपंचमी हा सण उन्हाळ्यात साजरा केला जाणारा आहे. उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठीदेखील पांढऱ्या रंगाला विशेष महत्व आहे.