नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते. मडक्यामध्ये धान्य पेरले जाते. त्यावर अखंड नंदादीप लावला जातो. रोज फुलांची माळ, सकाळ-संध्याकाळ आरती, सार्वजनिक उत्सवातही, हे सारे सोपस्कार केले जातात. घरोघरीही घटस्थापना होते. प्रत्येक घराची पद्धत वेगवेगळी असते. कुणाकडे उठता-बसता सवाष्ण, कुठे अष्टमीला तर कुठे नवमीला ब्राह्मण, सवाष्ण जेवू घालतात. कुणाकडे कुमारिकेचे भोजन असते. नवमीच्या दिवशी अनेक ठिकाणी होमहवन असते. पूर्णाहुती म्हणून पुरणावरच स्वयंपाक असतो. बरेच जण नऊ दिवस उपवास करतात. तर कुणी धान्यफराळ करतात. काही घरांमध्ये देवीचा गोंधळही घातला जातो.

बुधवार, दि. १० आक्टोबर रोजी सकाळी ६ वाजून ३२ मिनिटांनी सूर्योदय होत आहे. आश्विन शुक्ल प्रतिपदा दिवशी सकाळी ७ वाजून २५ मिनिटांपर्यंत आहे. नंतर द्वितीया तिथी जरी असली तरी त्या दिवशी दुपारी १ वाजेपर्यंत घटस्थापना करण्यास हरकत नाही असे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. याविषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले, त्या दिवशी सूर्योदयाला अश्विन शुक्ल प्रतिपदा असल्याने तो दिवस महत्त्वाचा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देवीने नवरात्राचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला. महिषासुराचा वध केला म्हणून महिषासुरमर्दिनी असे तिचे नाव रूढ झाले. या तिच्या शक्तिरूपाचीच पूजा नवरात्रीत केली जाते. वाघावर आरूढ झालेली, हातात तलवार, खड्ग आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्तीच नवरात्रीत पूजिली जाते. भोंडला हा नवरात्रीमध्ये महिलांनी एकत्र येत साजरा करायचा एक अनोखा खेळ. पाटावर हत्ती काढून, त्याच्याभोवती, सख्यांसंगे फेर धरून, गाणी म्हणली जात. आता या भोंडल्याचे प्रमाण कमी झाले आहे. यामध्ये शेवटी खिरापत ओळखण्याची आणि एकत्र मिळून ती खाण्याची मजा काही वेगळीच.