भारतात कर्करोग, मधुमेह आणि हृदयरोगांसारख्या असंसर्गजन्य रोगांना आळा घालण्यासाठी रुग्णाच्या लिंगनिहाय असलेल्या विशिष्ट गरजांचा अभ्यास मंडी येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे (आयआयटी-मंडी) केला जाणार आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून या संशोधनासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. भारतातील महिलांमध्ये कर्करोग, मधुमेह, हृदयरोग आदींचे प्रमाण वाढत आहे. विशेषत: महिलांमध्ये या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी कोणत्या विशिष्ट उपाययोजना केल्या पाहिजेत, हे जाणून घेण्याचा उद्देश यामागे आहे.
‘आयआयटी’च्या प्राध्यापक रमणा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हा अभ्यास केला जाणार आहे. याविषयी त्यांनी सांगितले की, ‘‘पंजाब प्रांतातील विविध भागांतून (जेथे विकासाचे प्रमाण भिन्न भिन्न आहे) कर्करोग, मधुमेह आणि हृदयरोगांविषयी माहिती जमा केली जाईल. हे काम वेगवेगळ्या फेऱ्यांत केले जाईल. एकंदरीतच वैयक्तिक आरोग्य, व्यवस्था, आरोग्यसेवेचे स्वरूप आणि उपचारांचे पर्याय यावर लिंगनिहाय कसा परिणाम होतो हे जाणून घेतले जाणार आहे. असंसर्गजन्य रोग होण्यात लिंगनिहाय जो वाढता फरक दिसून येतो, त्याची मूळ कारणे यातून शोधली जाणार आहेत.’’ या अभ्यासात रोगविषयक सर्वसाधारण बाबींबरोबरच सामाजिक-आर्थिक घटकांवर आधारित माहिती जमा केली जाईल.
भारतात महिलांसाठी आरोग्याच्या सोईसुविधा कशा प्रकारे पुरविल्या जाव्यात, जेणे करून त्यांच्यात कर्करोग-मधुमेहादी असंसर्गजन्य रोगांना प्रतिबंध होऊ शकेल, हे प्रामुख्याने समजून घेणे हा या संशोधन प्रकल्पाचा एक भाग आहे. महिलांसाठी धोरण आखताना सरकारी संस्थांना याची मदत होईल, असे ठाकूर म्हणाल्या.