उद्या शनिवार (१९ ऑगस्ट) रोजी ‘वर्ल्ड फोटोग्राफी डे’ आहे. सुंदर छायाचित्र कॅमेऱ्यात टिपणे हीदेखील अनेक कलांपैकी एक अनोखी कला आहे. तुम्ही हौशी छायाचित्रकार असाल अथवा व्यावसायिक, प्रवास हे छायाचित्रणाचे महत्त्वाचे अंग आहे. विविध ठिकाणी फिरून काढलेल्या छायाचित्रांमध्ये त्या परिसरातील वैविध्य आणि महत्व अधोरेखित होत असते. कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये आपल्याला हवे ते दृश्य योग्यप्रकारे टिपण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. फोटोग्राफीमध्ये अनेक प्रकार आहेत. नैसर्गिक फोटोग्राफी हा अनेक प्रकारांपैकी एक महत्वाचा प्रकार आहे. निसर्गाचे सुंदर दृश्य कॅमेऱ्यात टिपायचे असल्यास गोवापेक्षा दुसरा पर्याय विचारात येऊच शकत नसल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये. मोठा समुद्र किनारा लाभलेले गोवा हे राज्य नैसर्गिक प्रेक्षणीय स्थळांनी भरलेले आहे. कॅमेरा जणू गोव्याच्या प्रेमातच पडतो.
त्यामुळेच अनेक छायाचित्रकारांसाठी गोवा म्हणजे फोटोग्राफीची पंढरी आहे. कॅमेऱ्याच्या लेन्समागे राहून गोव्याचा सुंदर निसर्ग आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याचा मनमुराद आनंद ते लुटतात. हल्ली अनेक तरुणांमध्ये फोटोग्राफीचे आकर्षण वाढल्याचे पाहायला मिळते. घरातूनदेखील यास प्रोत्साहन दिले जाते. स्वत:चा ‘डीएसएलआर’ कॅमेरा गळ्यात अडकवून ही तरूण मंडळी सुंदर छायाचित्र टिपण्याच्या शोधात घरातून बाहेर भटकायला निघतात. गोवा हे असे निसर्गसंपन्न ठिकाण आहे, की ज्याला कितीही वेळा भेट दिली तरी प्रत्येकवेळी हाती काहीतरी नवीन गवसते. गोव्यातील पाऊस, समुद्र किनारा, ऐतिहासिक इमारती, हिरवाईने वेढलेले रस्ते, बॅक वॉटर, नैसर्गिक ठिकाणे कितीही अनुभवली तरी समाधान होत नाही. गोव्यात फिरताना शरिरात एक नवउर्जा निर्माण होते. मन तणावमुक्त होऊन अंतरात्म्याशी सलग्न होते. ह्या सर्व आठवणी सैदव जवळ असाव्यात यासाठी कॅमेऱ्यापेक्षा दुसरे चांगले माध्यम कोणते असू शकते.
गोव्याचे सौंदर्य आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी दरवर्षी हजारोंनी फोटोग्राफर्स गोव्यात येतात. गोव्यातील प्रत्येक पर्यटनस्थळ हे फोटोशूटसाठी अतिशय उत्तम असे आहे. सोनेरी वाळू लाभलेले समुद्र किनारे, लांबच लांब शेतं, पांढरी शुभ्र चर्च, मंदिर त्याचबरोबर अन्य धार्मिकस्थळं, जंगल, फुलबागा, समुद्रातील नैसर्गिक जलसंपदा, साहसी खेळ, गोव्यातील खाद्यपदार्थ, सण, पारंपरिक उत्सव आणि स्थानिक संस्कृतीचं दर्शन इथे होते. इतक्या विविधतेने नटलेला गोवा एका भेटीत पूर्ण पाहून होणे शक्यच नाही. किंबहुना अनेक देशी आणि विदेशी पर्यटकांचा विस्तीर्ण गोव्यातील नवीन-नवीन स्थळांचा शोध घेण्याकडे ओढा असल्याचे पाहायला मिळते.